प्रवाशांना अनेकदा टॅक्सी चालकांकडून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी नकार दिला जातो. त्याचे कारणही त्यांना सांगितले जात नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला समोरे जावे लागते. मात्र, आता त्यांची या त्रासातून सुटका होणार आहे. कारण, प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता तीन रंगांचे दिवे लावण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना यापूर्वीच जाहीर केली असल्याचे वाहतूक आयुक्त शेखर चन्ने यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सांगितले. चन्ने म्हणाले, अशा प्रकारे तीन दिवे लावलेल्या टॅक्सींना प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून नव्या ऑटो रिक्षांवरही अशा प्रकारे दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य सरकारने संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात जानेवारी अखेरपर्यंत नोंदणीकृत टॅक्सींवर अशा प्रकारे तीन रंगांच्या दिव्यांची अंमलबजावणी करण्यारी तारिख निश्चित करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सरकारने ऑटो रिक्षांवर अशा प्रकारचे दिवे कधीपर्यंत बसवण्यात यावेत यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार परिवहन आयुक्तांना दिले आहेत.
सरकारच्या अधिसुचनेनुसार, हिरवा, लाल आणि पांढरा अशा तीन रंगाचे एलईडी दिवे टॅक्सींवर लावण्यात येणार आहेत. यातील हिरव्या दिव्याचा अर्थ प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी टॅक्सी उपलब्ध आहे असा होतो. लाल दिव्याचा अर्थ टॅक्सीमध्ये आधीच प्रवाशी बसलेले आहेत असा होतो तर पांढऱ्या दिव्याचा अर्थ टॅक्सी सध्या भाडं स्विकारण्यासाठी उपलब्ध नाही असा होतो. इतकेच नव्हे तर या एलईडी दिव्यांवर ‘For Hire’, ‘Hired’ and ‘Off Duty’ असे शब्द इंग्रजीत आणि मराठीत लिहीणे अनिवार्य असणार आहे.
सध्या काही टॅक्सींवर पिवळ्या रंगाचे दिवे
मुंबई शहरात सुमारे ४३,५०० काळ्या-पिवळ्या टॅक्सी तर सुमारे अडीच लाख ऑटो रिक्षा आहेत. तर संपूर्ण राज्यात मुंबईसह ६५,५९१ नोंदणीकृत टॅक्सी आणि ९.७५ लाख नोंदणीकृत ऑटो रिक्षा आहेत. सध्या अशा प्रकारे दिवे बसवणे टॅक्सी आणि रिक्षांसाठी अनिवार्य नाही. मात्र, काही कॅबवर पिवळ्या रंगाचे दिवे बसवण्यात आलेले आहेत.
मराठी-इंग्रजीच्या वादात पाच वर्षे उशीर
सन २०१२मध्येच हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. दरम्यान, याबाबत लोकांच्या सूचना आणि आक्षेप मागवण्यात आल्याने जानेवारी २०१४मध्ये याच्या अंमलबजावणीला वेग आला होता. त्यानंतर पुन्हा या योजनेला पाच वर्षांचा उशीर झाला. कारण, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दिव्यांवर इंग्रजीबरोबरच मराठीतही शब्द लिहिण्यात यावेत असा आग्रह धरला होता.