लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलीना येथील तीन एकरचा भूखंड देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. लवकरच याचे भूमिपूजन होईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमिपूजन होऊ शकले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हे लतादीदींच्या हयतीत हे काम न झाल्याबद्दल खेद व्यक्त केला.

“जागेचा प्रश्न दोन दिवसांपूर्वी आम्ही सोडवला असून विद्यापीठाकडे जागा मागण्याचा प्रश्नच येत नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाची तीन एकर जागा असून तिथे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय झाला आहे. मंगशेकर कुटुंबीयांनी नाराजी जाहीर केली आहे. लता मंगेशकरांच्या नेतृत्वात समिती निर्माण झाली होती. शिक्षणाचं वातावरण असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय महाविद्यालय झालं तर चांगलं होईल असं त्यांचं मत होतं. पण विद्यापीठाच्या, कुलगुरुंच्या काही अडचणी असतील ज्यामुळे जमीन मिळाली नाही. त्यांच्या हयतीत जर भूमीपूजन झालं असतं तर ते मंगेशकर कुटुंबीय आणि देशवासियांसाठी समाधानकारक ठरलं असतं,” असं उदय सामंत म्हणाले आहेत.

लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाला कलिनात जागा; श्रद्धांजली सभेत उदय सामंत यांची घोषणा

“यापुढे देशभरातील कोणत्याही विद्यापीठात मास्टर दिनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या नावाने एखादा अभ्यासक्रम सुरु केला जाणार असेल तर आधी कुटुंबीयांची परवानगी घ्यावी असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. अशा आशयाचं स्पष्ट पत्रच त्यांनी विद्यापीठाला दिलं आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. “आम्हा सर्वांचंचं दुर्दैव आहे. विद्यापीठाने जर त्यावेळी ही जागा द्यायचा निर्णय घेतला असता लतादीदींच्या हयातीत हे काम झालं असतं आणि स्वप्नपूर्तीकडे वाटचाल झाली असती,” असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लता मंगेशकर यांची गाणी कायमच ओठांवर असायची. पण त्यांना प्रत्यक्षात कधी भेटता येईल असे वाटले नव्हते. दोन वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही भेट घडवून आणली. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ व्हावे अशी त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यामुळे राज्य शासनाने हे महाविद्यालय उभारण्याचे निश्चित केले. त्यासाठी मंगेशकर कुटुंबियांसह संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची समिती उभारण्यात आली. काही तांत्रिक अडचणींमुळे महाविद्यालयाला जागा मिळण्यास अडचण आली. परंतु या महाविद्यालयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलिना येथील ३ एकरचा भूखंड देण्याचे निश्चित केले आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी गुरुवारी बोलताना दिली होती .