मुंबई : आयटीआयच्या प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ‘कुशल’ ही चॅटबॉट सुविधा सुरू करण्यात आली आहे. आयटीआय प्रवेशाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी सहज दूर करणे शक्य होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या विभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावरील भार कमी होण्यास मदत होत आहे.

राज्यात आयटीआयच्या जवळपास एक हजार संस्था आहेत. यामध्ये ४१९ शासकीय संस्था तर ५८८ अशासकीय संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये मिळून आयटीआयच्या तब्बल १ लाख ५४ हजार जागा आहेत. आयटीआयमधील या जागांसाठी दरवर्षी साधारणपणे तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी अर्ज करतात. आयटीआयच्या जागांसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागतात.

त्यासाठी आयटीआयच्या हेल्पलाईन क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधून समाधानकारक उत्तर मिळवतात. मात्र त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीवर तातडीने उत्तर मिळावे यासाठी आयटीआयकडून यंदा प्रथमच ‘कुशल’ हा चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे.

दरवर्षी विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांसंदर्भात एक प्रश्नावली तयार करून ती ‘कुशल’ चॅटबॉटवर अपलोड करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक प्रश्नांचे उत्तर त्यांना तातडीने मिळावे यासाठी अधिक प्रश्नांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. हा चॅटबॉट अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला काही विलंब झाला असला तरी त्यानंतर अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘कुशल’ चॅटबॉटमुळे विद्यार्थ्यांचे तातडीने समाधान करणे शक्य होत असून, त्यांना अर्ज भरताना येत असलेल्या अडचणी दूर करण्यास मदत होत आहे. हा चॅटबॉट विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेऊन आयटीआयमधील तंत्रज्ञांनीच तयार केला आहे. तसेच पुढील वर्षात यामध्ये अनेक सुधारणा करून तो विद्यार्थ्यांसाठी कसा अधिक उपयुक्त होईल यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आयटीआयमधील अधिकाऱ्यानी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेल्पलाईन क्रमांकावरील भार कमी होण्यास मदत

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून विभागनिहाय मदत कक्ष सुरू केले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागांतर्गत जिल्ह्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र आयटीआयने सुरू केलेल्या ‘कुशल’ चॅटबॉटला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मदत कक्षांवर येणार भार कमी होण्यास मदत झाली असल्याचेही आयटीआयमधील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.