मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणूकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री जाहीर केला. या प्रारुप आराखड्यावर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणूकीच्यावेळी जशी प्रभाग रचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक नवीन बांधकामे झाली आहेत. सागरी किनारा मार्ग, अटल सेतू, मेट्रोची बांधकामे या साऱ्या गोष्टींचा या प्रभाग रचनेत समावेश करण्यात आला आहे.
ही विकासकामे नक्की कोणत्या प्रभागात येतील त्याची नोंद या नव्या प्रारुप आराखड्यात देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २७ विभाग कार्यालयांतील करनिर्धारण व संकलन विभागाच्या कार्यालयात नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. मुंबई प्रमाणे महानगर क्षेत्रातील अन्य महापालिकांतील प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली मात्र त्याचे तपशील उपलब्ध झाले नाहीत.
पुण्यात ४१ प्रभाग, १६५ नगरसेवक पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ झाली आहे. सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहोचली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.