भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असताना भारतातील काही शोरूममध्ये पाकिस्तानी कपड्यांची विक्री केली जात असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संतप्त कार्यकर्त्यांनी लोअर परळमधील जारा शोरुमवर धडक दिली. पाकिस्तानी कपड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक केली आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये आपल्या लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जात असताना जारा शोरुममध्ये पाकिस्तानी कपड्यांची विक्री केली जात असल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
मनसेच्या कार्यकर्त्या रीटा गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली काही कार्यकर्त्यांनी शोरुममध्ये गोंधळ घातला, असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. पाकिस्तानी कपडे विकू नका, अशी सूचना व्यवस्थापनाला दिली आहे. जर त्यांनी कपड्यांची विक्री बंद केली नाही तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा गुप्ता यांनी दिला. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी चित्रपट कलाकारांविरुद्ध आंदोलन केले होते.
पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित करू दिले जाणार नाहीत, असे मनसेने म्हटले होते. ऐ दिल है मुश्कील आणि रईस चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम केले होते. त्या चित्रपटांच्या प्रदर्शनाला मनसेने विरोध केला होता. उरीमध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटांना विरोध करण्यात आला. पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमांवरही शिवसेनेने बंदी घातली होती. परंतु यावेळी प्रथमच पाकिस्तानचे कपडे विकू नका, अशी मागणी राजकीय पक्षाकडून करण्यात आली आहे.