मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येत असलेले उद्धव आणि राज ठाकरे विजयी मेळाव्यातून मराठी माणसांच्या एकजुटीसाठी हाक देण्याची शक्यता आहे. मात्र, याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांत मात्र चढाओढ सुरू आहे. ‘मराठीबाबत अधिक आक्रमक आपणच’ हे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून त्यात अमराठी नागरिक तसेच व्यापारी, व्यावसायिकांना त्रास दिल्या गेल्याच्याही तक्रारी येत आहेत. ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या अशा घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेने शनिवारी जल्लोष मेळावा आयोजित केला आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. हिंदीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर वातावरण तापले असतानाच ठाणे व मीरा-भाईंदरमधील दोन घटना बोलक्या ठरतात. मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. दुसरीकडे, ठाण्यात मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्याला शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी चोप देत माफी मागण्यास लावले. ठाणे व मीरा-भाईंदरमधील या दोन घटनांवरून मराठीचा कैवार घेण्यावरून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेमध्ये जणू काही चढाओढच सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमकपणे मराठी विरुद्ध अमराठी अशी भूमिका घेऊ लागले असून त्याविरोधातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळून निषेध मोर्चा काढला होता. आपला विरोध भाषेला नव्हे तर हिंसाचाराला आहे, असे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसे अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा मुद्दा उकरून काढला जातो. मराठी मतांचे अधिकाधिक ध्रुवीकरण करण्याचा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यंदा त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्याने तो आयताच मिळाला. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे अमराठी मतांचे एकत्रीकरण भाजपच्या पथ्यावर पडू शकेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र, याचा फटका बसू शकतो.

भाषेला नव्हे, हिंसेला विरोध!

भाईंदर : मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीनंतर मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपला विरोध भाषेला नसून हिंसाचाराला असल्याची भूमिका घेतली आहे. मीरा रोड येथील जोधपूर मिठाई दुकानाचे चालक बाबुलाल चौधरी यांनी मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना ३० जून रोजी घडली होती. याप्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गुरुवारी व्यापारी संघटनांनीही निषेध मोर्चा काढत दुकाने बंद ठेवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. दीपक पवार यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

प्राथमिक शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधात सरकारच्या निर्णयाची प्रतिकात्मक होळी केल्याप्रकरणी डॉ. दीपक पवार यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांविरोधात आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आझाद मैदान परिसरात २९ जून रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सहभागी झाले होते.