मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली असून मुंबईत यापुढे नवीन व्यावसायिक आरएमसी प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या कार्यान्वित असलेले आरएमसी प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याकरिता या प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील प्रदूषणाबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ढाकणे यांनी एमपीसीबीने केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. प्रदूषणाबाबत विचार करताना केवळ मुंबईचा विचार न करता मुंबई महानगर प्रदेशाचा विचार केला जातो.

हेही वाचा : नववर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान वेळोवेळी जे निर्देश दिले जातात त्याचे पालन केले जात असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. न्यायालयाच्या सूचनांनुसार मुंबई महानगर प्रदेशासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची दर महिन्याला बैठक होते.

२८ नियमांची मार्गदर्शक तत्त्वे

बांधकामाच्या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेली २८ नियमांची मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांना बंधनकारक असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. मुंबईतील रेडीमिक्स प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याकरिता या प्रकल्पाला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच यापुढे मुंबईत नव्या आरएमसी प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असे ढाकणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मालाड परिसरात २५ वर्षीय महिलेची हत्या; आरोपी पतीला अटक

महानगरातील सर्व रिक्षा सीएनजीवर

लाकडावर चालणाऱ्या बेकरी यापुढे बंद करण्यात येणार असून या बेकरी विद्याुत यंत्रणेवर चालवण्यास उद्याुक्त केले जाणार आहे. त्याकरिता त्यांना एक वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सर्व रिक्षा सीएनजीवर रुपांतरित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईतील खडीनिर्मिती करणारे प्रकल्प, आरएमसी प्रकल्प यावर गेल्या काही महिन्यात कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कारखान्यांत मार्गदर्शक तत्त्वे पायदळी

मुंबईतील वायू प्रदूषणात होत असलेली वाढ लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगर क्षेत्रातील रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटच्या कारखान्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालनच होत नसल्याचे निदर्शनास आले असून यासंदर्भात मंडळाकडे नुकतीच तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा : ई – बाईकविरुद्ध वाहतूक विभागाची विशेष मोहीम; ११ दिवसांत ६७२ ई बाईक्स जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही रेडीमिक्स सिमेंट काँक्रीट कारखान्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार रेडीमिक्स सिमेंट कारखाने असलेल्या परिसरातील पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाण मोजण्यासाठी हवा गुणवत्ता निरीक्षक स्थापन करणे बंधनकारक आहे.