मुंबई : करोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी नवे निर्बंध लागू केले असून त्यानुसार संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळे, बागा, मैदाने येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सुरूवातीला पोलिसांनी ७ जानेवारी २०२२ पर्यंत जमावबंदी लागू केली होती, पण राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनंतर आता मुंबई पोलिसांनीही नव्या निर्बंधांचा कालावधी १५ जानेवारीपर्यंत वाढवला आहे.
नव्या आदेशीनुसार, लग्न समारंभ, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल. अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. चौपाटय़ा, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत, उपायुक्त चैतन्य एस. यांनी हे आदेश दिले आहेत.
राज्यात ८,०६७ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या ८,०६७ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर ओमायक्रॉनचे फक्त चारच रुग्ण आढळले.
मुंबईत दिवसभरात ५,४२८ नवे रुग्ण आढळले. ठाणे शहर ३४०, नवी मुंबई २८६, मीरा-भाईंदर १६७, वसई-विरार १६४, नाशिक जिल्हा १२४, पुणे शहर ४२०, उर्वरित पुणे जिल्हा १२२, िपपरी-चिंचवड १३९, सातारा ४६, मराठवाडा ७३, नागपूर जिल्हा ९१ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, मीरा भाईंदर व पनवेल येथील प्रत्येकी एकाचा त्यात समावेश आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४५४ झाली.
सर्वाधिक बाधितांचे प्रमाण मुंबईत
राज्यात बाधितांचे प्रमाण पुण्यामध्ये सर्वाधिक होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या वेगाने वाढल्यामुळे येथील बाधितांचे प्रमाण तीन टक्क्यांवर गेले आहे. त्या खालोखाल पुण्यामध्ये बाधितांचे प्रमाण सुमारे अडीच टक्के आहे, तर सांगलीमध्ये दोन टक्के आहे. दोन टक्क्यांवर बाधितांचे प्रमाण असलेले हे तीन जिल्हे आहेत.
ओमायक्रॉन लसघटक बनवण्याची ‘सीरम’ला परवानगी
नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा फैलाव झपाटय़ाने होत असल्याने त्यावर लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिटय़ूटला एक औषध घटक बनवण्याची परवानगी भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीजीसीआय) दिल्याची माहिती सरकारी सूत्रांनी शुक्रवारी दिली. ‘सार्स-सीओवी-२ आरएस’ असे या औषध घटकाचे शास्त्रीय नाव आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना सीरमला मिळालेली ही मंजुरी महत्त्वाची मानली जाते.