मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २८ मे २०२५ च्या परिपत्रकानुसार २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दिवाळीची सुटी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकानुसार, याच कालावधीत काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दिवाळीसाठी अनेक प्राध्यापक व विद्यार्थी गावी किंवा शहराबाहेर जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांचे हित लक्षात घेता दिवाळीच्या सुटीमध्ये कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत, अशी विनंती महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे (मस्ट) मुंबई विद्यापीठाकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई विद्यापीठाने नुकतेच विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बी.कॉम, बी.कॉम (एमएस), बी.कॉम (ए ॲण्ड एफ), बी.एससी. (संगणक शास्त्र) अशा अनेक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र मुंबई विद्यापीठाने याच कालावधीत दिवाळीची सुटी जाहीर केली आहे. दिवाळीच्या सुटीमध्ये अनेक प्राध्यापक त्यांच्या गावी किंवा शहराबाहेर जाण्याचे नियोजन करतात. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे काही महाविद्यालयातील प्राचार्य त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना सुटीच्या कालावधीत परीक्षांसाठी पर्यवेक्षणाचे कार्य बंधनकारक करतात. त्यामुळे प्राध्यापकांचे नियोजन बिघडू शकते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सुटीच्या कालावधीत कोणत्याही परीक्षेचे आयोजन करू नये, अशी विनंती महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेकडून मुंबई विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पर्यवेक्षणाचे कार्य करून घ्या
दिवाळीच्या सुटीदरम्यान परीक्षांसाठी प्राध्यापकांवर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपविण्याऐवजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नियोजित परीक्षांचे पर्यवेक्षानाचे कार्य करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्राध्यापकाला वेठीस धरू नये. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने सुस्पष्ट परिपत्रक काढावे, अशी विनंती महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने केली आहे.