कोरडा गेलेला जून आणि तलावक्षेत्रातील आटत चाललेले पाणी यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचे संकट अधिकच गहिरे झाले आहे. या पाश्र्वभूमीवर २० टक्के पाणीकपातीचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. परंतु पाणीकपातीचा निर्णय झाला असला तरी निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात अवघ्या काही सरी पडल्यानंतर संपूर्ण महिना कोरडा गेला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या विक्रमी पावसाने भरलेल्या तलावांमधील पाण्याची पातळीही झरझर आटली. मुंबईला पाणीपुरवठा होत असलेल्या वैतरणा तलावक्षेत्रात अवघ्या १५ दिवसांचा तर भातसा तलावक्षेत्रात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज सरासरी ३७५० दशलक्ष लिटर पाणी लागते. उपलब्ध असलेला १,१८,८१५ दशलक्ष लिटर पाणीसाठा मुंबईकरांची तहान ३१ दिवस पुरवू शकेल. कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठीही पालिकेने निविदा मागवल्या आहे. मात्र, या प्रयोगासाठी येणारा खर्च आणि प्रयोगाला याआधी आलेले अपयश पाहता उपलब्ध साठा पुरेसा पाऊस पडेपर्यंत साठवून ठेवणे गरजेचे ठरणार आहे. पावसाची आतापर्यंतची स्थिती पाहता प्रशासनाने २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा बुधवारी स्थायी समितीत होईल. दर आठवडय़ाला स्थायी समितीत पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जातो.  तलावक्षेत्रातील पाण्याची सध्याची उपलब्धता लक्षात घेता पाणीकपातीच्या निर्णयाप्रत समिती येईल, अशी शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून मांडण्यात येणाऱ्या पाणीकपातीच्या ठरावावर निर्णय घेतला जाईल. मात्र, समितीतील निर्णयानंतर लागलीच पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. गेल्याच आठवडय़ात तसे संकेतही देण्यात आले होते.

कोयनेतील वीजनिर्मिती बंद
नाशिक : पाणीटंचाई पाठोपाठ राज्यावर वीजटंचाईचे संकट ओढवले असून पाणी, गॅस व कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक येथे दिली. पाण्याअभावी कोयना तर गॅसअभावी दाभोळ प्रकल्पात वीजनिर्मितीचे काम बंद झाले आहे. नाशिकच्या एकलहरा केंद्रात १४ दिवस पुरेल, इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी व विजेचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. नाशिक विभागातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार येथे आले होते.  

तलावातील पाण्याची
पातळी खालावली आहे. शहरातील पाणी कपातीबाबतचा प्रशासनाचा निर्णय बुधवारी स्थायी समितीच्या संमतीनंतर लागू करण्यात येईल. पाणीकपात केव्हा आणि किती लागू करायची याबाबत समितीतच शिक्कामोर्तब होईल.
– सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.