मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शनिवारी येथे सांगितले. शेलार यांनी तज्ञांबरोबर बैठक घेऊन बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेतला.

प्राथमिक माहितीनुसार राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात, अशा ३,००० हून अधिक बारव आहेत. त्यांचे ऐतिहासिक मूल्य मोठे आहे व स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ आहे. जलसंवर्धन आणि जलसंधारणाचे कार्य होत आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व बारवांची जिल्हानिहाय नोंदणीची आवश्यकता आहे. यासंदर्भात शासकीय अधिकारी आणि जलसंधारण व ऐतिहासिक वारसा विषयामध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी नमूद केले.

पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. शासकीय नोंदी ही करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा उपयोग आणि जतन व संवर्धन कसे करावे, याची माहिती लोकसहभागातून विद्यार्थी अधिकारी व तज्ञांकडून पथनाट्य व अन्य पद्धतीने सर्वांना दिली जाणार आहे. या नोंदींचा अहवाल तीन महिन्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.