मुंबई : माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपशी युती करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना पसंत पडलेला नाही.  यातूनच पुढील दिशा निश्चित करण्याकरिता जनता दलाच्या नेत्यांची ३० तारखेला पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. देवेगौडा यांनी कर्नाटकात भाजपशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला. धर्मनिरपेक्ष जनता दलाने भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील जनता दलाचे नेते व कार्यकर्त्यांना मान्य झालेला नाही.

हेही वाचा >>> सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा -खरगे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजवादी चळवळीने वर्षांनुवर्षे संघ परिवार व भाजपच्या जातीयवादी धोरणाला विरोध केला. त्याच भाजपबरोबर हातमिळवणी कशी करणार, असा सवाल पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. पक्षाध्यक्ष देवेगौडा यांनी घेतलेली भूमिका मान्य नसल्याचे राज्य जनता दलाचे नेते प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी, मनवेल तुस्कानो, साजिदा निहाल अहमद, रेवण भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.  राज्यातील समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष आणि विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत. लोकशाही आणि संविधानविरोधी तसेच जातीयवादी व धर्माध अशा भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित सरकारला या कार्यकर्त्यांनी नेहमीच विरोध दर्शविला आहे. अशा भाजपबरोबर समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते कधीच हातमिळवणी करू शकणार नाहीत. यामुळेच येत्या ३० तारखेला जनता दल व समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगण्यात आले. समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते देवेगौडा यांच्या पक्षापासून फारकत घेणार आहेत.