मुंबई : खरीप हंगामाच्या खत पुरवठ्यात मोठी तूट राहिल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला १०.६७ लाख टन युरिया खताचा साठा मंजूर झाला होता. पण, प्रत्यक्षात ८.४१ लाख टन युरिया राज्याला मिळाला आहे. कापूस आणि मक्याला अखेरच्या टप्प्यात खत मात्रा देताना युरियाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून तातडीने पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
राज्याला खरीप हंगामात एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्र सरकारकडून १०.६७ लाख टन युरिया खताचा साठा मंजूर झाला होता. प्रत्यक्षात एकूण युरिया खतापैकी फक्त ७९ टक्के म्हणजे ८.४१ लाख टनाचा पुरवठा करण्यात आला. विशेषकरून ऑगस्ट महिन्यात २.७९ लाख टन युरिया मिळणे अपेक्षित असताना केवळ ०.९६ लाख टन युरिया मिळाला आहे.
खरीप हंगामात विविध रासायनिक खतांचा पुरवठा होत असतो. पण, शेतकरी युरिया खताचा वापर जास्त करतात. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला जुलै महिन्यात युरियाला जास्त मागणी असते. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कापूस, मक्यासह अन्य पिकांना खतांची गरज असते. पण, बाजारात युरियाचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना खते मिळाली नाहीत. त्याचा परिणाम कापूस आणि मका उत्पादनावर दिसून येणार आहे.
खरीप हंगामातील खत तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामात युरियाचा तुटवडा भासू नये. शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय खत आणि रसायन मंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. कमी खत पुरवठ्यामुळे सध्या राज्यात युरियाचा साठा केवळ २.३६ लाख टन इतकाच साठा राहिला आहे. हा गत पाच वर्षांतील सर्वात कमी साठा आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या युरियाचा तत्काळ पुरवठा करण्यात यावा. आणि रब्बी हंगामात १२ लाख टन युरिया खताचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
मका, कापसाला युरियाची गरज
राज्यात खरीप हंगामातील पेरण्यांनी सरासरी गाठली आहे. सुमारे १४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे यंदा १४.३० लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. मक्याच्या लागवडीत तब्बल ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस, मका आणि इतर पिकांसाठी अखेरच्या टप्प्यातील खताची मात्रा देण्यासाठी युरियाला मागणी वाढली असतानाच्या काळातच तुटवडा जाणावत आहे.
रब्बी हंगामात खतांचा तुटवडा जाणविणार नाही – कृषिमंत्री
खरीप हंगामात काही कारणांमुळे युरियाच्या मंजूर साठ्यापेक्षा कमी पुरवठा झाला आहे. रब्बी हंगामात तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून खरिपातील प्रलंबित साठ्यासह रब्बीसाठी १२ लाख टन युरिया खताची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. रब्बी हंगामासाठी राज्यात अपेक्षित खतांचा साठा असेल. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.