बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांसह, कोकण, विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही या दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालं. दरम्यान, आता पुढील काही दिवस पुन्हा पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीसुसार, मुंबई ठाण्यात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात कोणताही गंभीर हवामान अपेक्षित नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर अन्य काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, राज्याचा किनारपट्टीचा भाग वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मंगळवारी (३१ ऑगस्ट) हाहाकार उडवला होता. पुरात सात नागरिकांसह शेकडो जनावरे वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यात औट्रम घाटात दरडी कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक दुपापर्यंत ठप्प होती.मराठवाडय़ात ६७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.