मुंबई :  राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार आहे. राज्य सरकारने एप्रिल ते जुलै २०२५ या काळातील सातव्या हप्त्यासाठी १९३२.७२ कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (पीएम किसान) धर्तीवर राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा एप्रिल ते जुलै २०२५ या काळातील सातव्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यासाठी १९३२.७२ कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला.

पीएम किसानच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो. पीएम किसानच्या २० व्या हप्त्याचा निधी दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची प्रतीक्षा होती.

राज्यातील ९३.०९ लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा निधी मिळत होता. कुटुंबातील एकाच शेतकरी खातेदाराला हा लाभ दिला जातो. पण, एकाच कुटुंबातील दोन शेतकरी खातेदार लाभ घेत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पीएम किसानच्या २० व्या हप्त्यात राज्यातील १८ हजार शेतकऱ्यांचा लाभ स्थगित करण्यात आला. त्यांची फेर पडताळणी करून त्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ यावेळी ९२.९१ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. उर्वरीत १८ हजार खातेदारांची पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार कटिबद्ध

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी १९३२.७७ कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे. हा निधी पुढील तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.