मुंबई: भांडवली बाजारातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्ससारख्या वजनदार कंपन्यांच्या समभागांत झालेल्या मोठ्या खरेदीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदवली. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कपातीचा आशावाद आणि देशांतर्गत शेअर बाजारांतील सकारात्मक कलाने डॉलरच्या तुलनेत रुपयाला ४० पैशांची बळकटी दिली.
मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७०.६४ अंशांनी वधारून ८१,६४४.३९ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४८२.१३ अंशांची कमाई करत ८१,७५५.८८ च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०३.७० अंशांनी वधारला आणि २४,९८०.६५ वर बंद झाला.दिवाळीपर्यंत जीएसटी प्रणालीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याच्या सरकारच्या योजना आणि भू-राजकीय चिंता कमी झाल्यामुळे बाजारात आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
जीएसटी दराच्या सुसूत्रीकरणाच्या अपेक्षा आणि भारताच्या पतमानांकनात झालेल्या सुधारणांमुळे बाजाराने गती कायम राखली आहे. रशिया आणि युक्रेनमधील भू-राजकीय तणाव कमी होण्याच्या चिन्हांमुळे अतिरिक्त आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींवर अधिक स्पष्टता येईपर्यंत बाजार तेजीला एका सीमेपर्यंत मर्यादा पडतील.
उल्लेखनीय म्हणजे, व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिड-कॅप कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली. शिवाय चीनकडून दुर्मिळ खनिज चुंबकाशीसंबंधित पुरवठ्याच्या आशा निर्माण झाल्याने वाहन निर्मिती क्षेत्रातही तेजी बहरली, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचा समभाग ३.५ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स ३.१६ टक्के, तर रिलायन्स इंडस्ट्रीज २.८२ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ, टेक महिंद्र, कोटक महिंद्र बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मारुती यांचे समभाग तेजीत होते. मात्र, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, महिंद्र अँड महिंद्र आणि एचसीएल टेक यांची कामगिरी निराशनजनक राहिली.
रुपया ४० पैशांनी मजबूत
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ४० पैशांनी वधारून ८६.९९ पातळीवर मंगळवारी बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीनंतर, अतिरिक्त आयात शुल्कासंबंधाने चिंता कमी झाल्या आहेत.परकीय चलन बाजारात, रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८७.२४ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरात त्याने ८७.३१ हा नीचांक दाखविला आणि ८६.९२ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. सोमवारी, रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी वधारून ८७.३९ पातळीवर बंद झाला होता.
जीएसटी सुधारणांबाबत आशावादामुळे भारतीय रुपया एका महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. एकंदर बाजारातील भावनांना चालना मिळाल्याने रुपया यापुढे सकारात्मक आगेकूच कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. खनिज तेलाच्या किमतीत घट आणि एकूणच डॉलरमधील कमकुवतपणा देखील रुपयाला आधार देऊ शकेल, असे मत मिरॅ ॲसेट शेअरखानचे कमॉडिटीज आणि करन्सीजचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले.
सेन्सेक्स ८१,६४४.३९ ३७०.६४ ( ०.४६%)
निफ्टी २४,९८०.६५ १०३.७० ( ०.४२%)
तेल ६५.९८ – ०.९३ %
डॉलर ८६.९९ – ४० पैसे