मुंबई : पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणाऱ्या आकांक्षी शौचालयांचे बांधकाम वादात सापडलेले असताना मुंबई महापालिकेने आता या शौचालयांच्या देखभालीसाठी मागवलेल्या निविदाही वादात सापडल्या आहेत. आकांक्षी शौचालयांच्या बांधकामाला स्थगिती असताना देखभालीसाठी निविदा काढणे हे राज्य विधिमंडळाने दिलेल्या निर्देशाचा अवमान आहे, असा आरोप करीत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी या निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या आकांक्षी शौचालयांचे बांधकाम वादात सापडलेले आहे. असे असताना मुंबई महापालिकेने या शौचालयांच्या देखभालीसाठी इच्छुक संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत.
लायन गेट, ओव्हल मैदान, फॅशन स्ट्रीट, विधान भवन, बाणगंगा, माहीम रेती बंदर या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शौचालयांची दहा वर्षे देखभाल व प्रचालनासाठी या संस्था निवडल्या जाणार आहेत. मात्र आधीच राज्य सरकारने शौचालयांच्या बांधकामाला स्थगिती दिलेली असताना मुंबई महापालिका प्रशासनाने देखभालीसाठी निविदा कशा काय मागवल्या, असा सवाल दक्षिण मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून या निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
आकांक्षी शौचालयांच्या बांधकामाची चौकशी सुरू आहे. या शौचालयांचे भवितव्य अनिश्चित आहे, विशेषतः या संदर्भात करण्यात आलेले उल्लंघन आधीच सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहेत. या निविदा प्रसिद्ध करणे म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने करदात्यांच्या पैशाची लूट आहे आणि राज्य विधिमंडळाचाही अवमान आहे, असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले. सरकारने दिलेली स्थगिती मुंबई महापालिका गांभीर्याने घेत नाही, असा आरोप करीत या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल का यावर प्रश्न उपस्थित त्यांनी केला आहे.
१४ पैकी सात प्रसाधनगृहे दक्षिण मुंबईत
लायन गेट, विधान भवन परिसर, फॅशन स्ट्रीट, बाणगंगा पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने १४ वातानुकूलित प्रसाधनगृहे बांधण्याचे ठरवले आहे. मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देश – विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शौचालयांची सुविधा नसल्याने पर्यटकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यामुळे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने पर्यटनस्थळी सोयी-सुविधांनी युक्त अशी वातानुकूलित प्रसाधनगृहे तयार करण्याचे ठरवले होते. मुंबईत १४ ठिकाणी अशी प्रसाधनगृहे सुरू केली जाणार असून त्यापैकी सात शौचालये ही दक्षिण मुंबईत आहेत. मात्र आकांक्षी शौचालये पदपथावर बांधण्यात येत असल्यामुळे पादचारी धोरणाचे उल्लंघन झाल्याचा आरोप मकरंद नार्वेकर यांनी केला होता. त्यानंतर विधानसभेतही आमदार अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी या शौचालयांच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.