मुंबई : मालाडमधील एका बारच्या बाहेर बुधवारी मध्यरात्री झालेल्या क्षुल्लक वादातून एका इसमावर बिअरच्या बाटल्या फोडून आणि चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्याचे नाव कल्पेश भानुशाली (३६) असे आहे. बुधवारी मध्यरात्री मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात ही घटना घडली.

कल्पेश भानुशाली (३६) बुधवारी रात्री मालाडच्या चिंचोली बंदर येथे मित्रासह मद्यपान करत बसला होता. रात्री भूक लागल्याने तो जीतेंद्र औचार याच्या दुचाकीवरून जेवण घेण्यासाठी निघाला होता. रात्री १.३० ते २.३० च्या सुमारास ते दोघे गुरूकृपा बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये गेले. मात्र रेस्टॉरंट बंद होण्याच्या तयारीत असल्याने व्यवस्थापकाने जेवणाचे पार्सल देण्यास नकार दिला. यावरून भानुशाली आणि बारच्या व्यवस्थापकामध्ये वाद झाला.

जुन्या मित्राने केला हल्ला

मद्याच्या नशेत असेलला भानुशाली बार व्यवस्थापकाला शिविगाळ करीत होता. त्या ठिकाणी कल्पेशचा जूना मित्र संजय मकवाना (२१) उभा होता. भानुशाली आपल्यालाच शिव्या देत आहे, असे त्याला वाटले. त्यावरून त्याची भानुशाली बरोबर शाब्दिक चकमक उडाली. भानुशालीचा मित्र जींतेद्र औचार मध्ये पडला आणि त्याने संजय मकवानाला जायला सांगितले. मात्र काही वेळाने संजय मकवाना आपल्या पाच-सहा साथीदारांना घेऊन तेथे आला. आरोपींनी कल्पेश भानुशालीवर हल्ला केला. त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. त्यानंतर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कल्पेशला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

तर भाऊ वाचला असता

कल्पेश भानुशाली याचा गणपती बनवण्याचा व्यवसाय होता. संजय मकवाना हा बँजो पथक चालवतो. गुरुकृपा बार रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. जर तो वेळेवर बंद झाला असता तर ही घटना घडली नसती आणि माझा भाऊ वाचला असता, असे कल्पेशचा भाऊ परेश भानुशाली याने सांगितले. कल्पेश आणि आरोपी संजय हे दोघे परिचित होते. मात्र सध्या त्यांच्यात वैमनस्य होते. त्यामुळे संजयने जुने भांडण काढून भावाची हत्या केली, असाही आरोप परेश भानुशाली याने केला.

मुख्य आरोपी फरार

या प्रकरणी मालाड पोलिसांनी हल्ला करणाऱ्या हेमंत पटेल (२०) याला अटक केली असून मुख्य आरोपी संजय मकवाना आणि इतर दोन साथीदार फरार आहेत. बार बंद करण्याच्या वेळी कल्पेशने बारच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ केली आणि त्यातूनच हाणामारी झाली, असे परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी सांगितले. कल्पेश आणि संजय यांच्यात पूर्वीपासून वैर होते का, त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.