मुंबई : मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी जामिनावर बाहेर असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांबाबत प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेशी (एफएसएल) नव्याने केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मालवण पोलिसांना दिले.

या प्रकरणी दोन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र आधीच दाखल झाले आहे, त्यामुळे, आपटे याचा जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाइल ताब्यात ठेवण्याचे कारण नाही, असा दावा आपटे यांच्या वतीने वकील गणेश सोवनी यांनी केली. जप्त करण्यात आलेल्या उपकरणांच्या तपासणीसाठी अर्ध्या तासाहून कमी कालावधी लागणार असताना एफएसएलने त्यासाठी नऊ महिन्यांहून अधिक काळाचा विलंब केला आहे. परिणामी आपल्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावाही आपटे याच्या वतीने करण्यात आला. तर, तपास यंत्रणेला अशा सामग्री जप्त करण्याचा अधिकार असल्याचा दावा अतिरिक्त सरकारी वकील संगीता शिंदे यांनी केला.

न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याच्या जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाइल फोन परत करण्याच्या विनंतीमागील तर्कावर प्रश्न उपस्थित केला. तसेच, गुन्हेगारी सामग्री अस्तित्वात असली किंवा नसली तरी, उपकरणांकडे संबंधित पुरावे म्हणून पाहिले जाते, असे न्यायालयाने म्हटले. त्याचवेळी, लॅपटॉपमध्ये किती माहिती आहे ? सर्व माहिती गुन्हेगारी स्वरूपाची आहे का ? आरोपीने डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला तर अधिकारांचे संतुलन कसे होईल ? अशी विचारणा न्यायालयाने केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचप्रमाणे, आपटे याच्यातर्फे केलेल्या युक्तिवादाकडे लक्ष वेधताना तपास यंत्रणेला खटल्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचा अधिकार आहे, परंतु आरोपीला त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेली गैर-गुन्हेगारी सामग्री मिळविण्याचा अधिकार आहे, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. या उपकरणांची उपलब्धता न्यायवैद्यक विभागाच्या तपासणीवर अवलंबून असेल. तथापि, उपकरणांबाबत न्यायवैद्यक विभागाशी केलेल्या शेवटच्या पत्रव्यवहाराचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मालवण पोलिसांना दिले.