मुंबई : मुंबईत स्वस्तात घर मिळवून देण्याची एक जाहिरात फेसबुकवर टाकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जोगेश्वरी येथील एका इसमाने या जाहिरातीला बळी पडून स्वस्त घराच्या मोहापोटी तब्बल १ कोटी ७ लाख रुपये गमावले. विशेष म्हणजे या भामट्यांच्या जाळ्यात सापडलेल्या फिर्यादीने तब्बल २५० वेळा ऑनलाईन व्यवहार करून ही रक्कम दिली होती. सायबर पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी ४३ वर्षांचे असून जोगेश्वरी येथे राहतात. त्यांना दक्षिण मुंबईत प्रशस्त घर हवे होते. ते स्वस्तात घर शोधत होते. दरम्यान, नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना फेसबुकवर ‘अपना घर अपने सिटी मे’ अशा आशयाची एक जाहिरात दिसली. त्यात बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर या ठिकाणी स्वस्तात घरे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता.
फिर्यादींना ते पेज आणि त्यावरील जाहिरात खरी वाटली. फिर्यादींना दादर येथे तीन खोल्यांचे घर हवे होते. त्यामुळे फिर्यादींनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादींना एक अर्ज पाठविण्यात आला. तो अर्ज भरल्यानंतर फिर्यादींना त्यांची फाईल मंजूर झाल्याचा एक ई-मेल पाठविण्यात आला. पुढील प्रक्रियेसाठी विशाल पांचाळ या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. काही दिवसात त्यांना वीरेंद्र मेहता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण अपना घर प्रकल्पाचे संचालक असल्याचे सांगितले आणि फिर्यादींना कमी किंमतीत दादरमध्ये तीन खोल्याचे घर मंजूर झाल्याचे सांगितले.
अशी केली फसवणूक…
सुरुवातीला त्यांच्याकडून नोंदणी शुल्क म्हणून ५० हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फिर्यादींची फसवणूक करण्यात आली. म्हाडा मंजुरी, महापालिकेचा ‘ना हरकत दाखला’, मंत्रालयातून मंजुरी अशा विविध कारणांसाठी पैसे मागण्यात आले. नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०२४ या ७ वर्षांच्या कालावधीत फिर्यादींकडून १ कोटी ७ लाख रुपये घेण्यात आले.
तब्बल २५० वेळा फिर्यादींनी ऑनलाईन व्यवहार करून आरोपीला पैसे पाठवले. दरम्यान, महापालिकेचा प्रभाग अधिकारी दीपकला अंतिम मंजुरीसाठी १० लाख रुपये द्यावे लागतील, असे विशाल पांचाळने सांगितले. त्यानुसार फिर्यादी वांद्रे येथे दीपक नावाच्या व्यक्तीला भेटले आणि १० लाख रुपये दिले. मात्र तरीही घर मिळाले नाही. पुन्हा आरोपींनी फिर्यादीकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. फिर्यादींनी एका मित्राकडे पैशांची मागणी केली. मित्राने एवढे पैसे कशाला हवे अशी विचारणा केल्यानंतर फिर्यादींनी घडलेला प्रकार सांगितला.
फिर्यादींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या मित्राला संशय आला. त्याने ही सायबर फसवणूक असल्याचे फिर्यादींना सांगितले. फिर्यादींनी याप्रकरणी पश्चिम सायबर विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ३ जून रोजी आरोपी विशाल पांचाळ, वीरेंद्र मेहता आणि दीपक नामक तीन व्यक्तींविरोधात फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी तपास करून बदलापूर येथे राहणाऱ्या संयम देवमणी पांडे या आरोपीला अटक केली. त्याने अपना घर नावाने फेसबुकवर बनावट पेज तयार केल्याची कबुली दिली.