मुंबई : तरुणींना अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत आहेत. एका विकृत इसमाने परदेशात शिकत असेलल्या तरुणीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल केले. या तरूणीवर पाळत ठेवण्यासाठी त्याने तिच्याच आईच्या नावाने स्नॅपचॅट खाते उघडले आणि तिच्यावर पाळत ठेवली होती. पीडित तरूणी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तिच्या आईच्या फिर्यादीवरून पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी २३ वर्षांची असून पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत आहे. पवईत तिचे आई, वडील राहतात. ती २०१९ पासून स्नॅपचॅट समाजममाध्यम वापरत आहे. याच स्नॅपचॅटवर तिच्याबाबत हा धक्कादायक प्रकार घडला.

आईच्या नावाने बनवले बनावट खाते

फेब्रुवारी महिन्यात पीडित मुलीला तिच्या आईच्या नावाने स्नॅपचॅटवर मैत्रीची विनंती (फ्रेंडशिर रिक्वेस्ट) आली होती. त्यावर तिच्या आईचे छायाचित्रे आणि कौटुंबिक माहिती होती. आईचेच खाते असल्याने तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. मात्र ते अकाऊंट तिच्या आईचे नव्हते. ते एका अज्ञात विकृत व्यक्तीचे होते. ही व्यक्ती तिच्या आईच्या नावाने सुरू केलेल्या खात्यावरून पीडित तरुणीवर पाळत ठेवत होता.

अश्लील छायाचित्रांची धमकी

या व्यक्तीने ५ फेब्रुवारी रोजी अचानक या तरूणीला धमकावायला सुरुवात केली. तुझी अश्लील छायाचित्रे माझ्याकडे असून ती व्हायरल करण्यात येतील अशी धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली. तिने आईशी संपर्क साधला. तेव्हा हे बनवावट खाते असल्याचे उघड झाले.

गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क) आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सोनम देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी तरुणीच्या परिचयाचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांनी स्नॅपचॅट आयडीवरून तांत्रिक तपशील मागवले असून आरोपीचा शोध सुरू आहे.