मुंबई : कंपनीच्या कामासाठी देश-विदेशात फिरणाऱ्या एका व्यवस्थापकाने खोटी बिले तयार करून कंपनीकडून लाखो रुपये उकळल्यचे उघडकीस आले आहे. दौर्यावर असताना तो साध्या हॉटेलात मुक्काम करायचा आणि पंचातारिकांत हॉटेलाची खोटी बिले सादर करून कंपनीकडून पैसे उकळायचा. एवढेच नव्हे तर जेवणाची अधिक रकमेची खोटी बिले तयार करायचा. कंपनीला संशय आल्यानंतर केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

अनुपम कापडिया (५३) यांचा मालकीची मालाड येथे ‘एनविरॉन स्पेशालिटी केमिकल’ नावाची कंपनी आहे. ही कंपनी विविध प्रकारच्या रसायनांची विक्री, पुरवठा आणि वितरण देश – विदेशात करीत असते. कंपनीने २०१३ मध्ये विशाल कलगुडे याची विपणन (मार्केटींग) विभागात वरिष्ठ व्यवस्थापकपदी नियुक्ती केली होती.

देशात आणि परेदशात कंपनीच्या कामानित्ताने विक्रीसाठी जाणे, ऑर्डर मिळवणे अशा प्रकारची कामे कलगुडे करीत होता. दौर्यावर असताना प्रवास भाडे, हॉटेलातील मुक्काम, तसेच जेवणाचे पैसे कंपनीतर्फे दिले जात होते. त्याची बिले सादर केल्यानंतर कंपनीकडून प्रतिपूर्ती (रिअम्बर्समेंट) करण्यात येत होती. विशाल कलगुडे मात्र खोटी बिले देऊन कंपनीकडून पैसे उकळत होता. तो साध्या हॉटेलात मुक्काम करायचा आणि नामांकित पंचतारांकित हॉटेलाची आणि जेवणाची बिले खोटी तयार करीत होता. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू होता.

…असे फुटले बिंग

विशाल कलगुडे सादर करीत असलेल्या बिलांबाबत कंपनीच्या लेखा विभागाला संशय आला. कंपनीने याप्रकरणी तपास करण्यासाठी वित्त विभागातील राजेंद्र जैन यांची तपास नियुक्ती केली. त्यांनी मालाड येथील हॉटेलमध्ये चौकशी केली असता कलगुडे याने सादर केलेले बिल त्या हॉटेलचे नसल्याचे उघड झाले. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच विशाल कलगुडे याने परस्पर ई-मेल द्वारे राजीनामा सादर करून पळ काढला. कंपनीने मात्र या घोटाळ्याचा सखोल तपास केला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कंपनीने एका सनदी लेखापाल कंपनीची नियुक्ती केली.

कलगुडे याने सादर केलेल्या देश आणि विदेशातील पंचतारांकित हॉटेलांच्या बिलांची छाननी सुरू करण्यात आली. त्यासाठी संबंधित पंचतारांकित हॉटेलशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. कलगुडे या हॉटेलमध्ये गेलाच नव्हता आणि त्याने संबंधित हॉटेल्सच्या नावाने बनावट बिले सादर केली होती. परदेशातील हॉटेलमधील ४२ युआन किंमतीच्या ज्युससाठी त्याने बिलात दिडशे युआन नमुद केले होते. म्हणजे कलगुडे जेवणाची बिले देखील खोटी तयार करून पैसे उकळत होता. कपंनीने केलेल्या चौकशीत विशाल कलगुडे याने देश आणि विदेशातील दौऱ्याच्या वेळी बनावटे बिले सादर करून कंपनीकडून ३१ लाख रुपये उकळले होते. याबाबत त्याला ४८ तासांच्या आता स्पष्टीकरण सादर देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याने ते सादर केले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१३ ते २०१८ या काळातील बनावट बिले कंपनीला आढळली होती. त्याच्याविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी भारतीय न्यायदंडसंहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७० आणि ४७१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.