मुंबई : मानखुर्द परिसरात महानगरपालिकेची केवळ एकच शाळा सुरू असून शेकडो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असतानाही पालकांना पदरमोड करून मुलांना खाजगी शाळेत पाठवावे लागत आहे. तसेच, खाजगी शाळेचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दूरवरच्या महापालिका शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत शालेय दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळांमधील पायाभूत व अन्य सुविधांमुळे अनेक पालकांचा कल महापालिकेच्या शाळांकडे वाढत आहे. मुंबईच्या २०१४ – ३४ विकास आराखड्यानुसार मानखुर्दमध्ये चार शाळांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याचा दावा जनजागृती विद्यार्थी संघाने केला आहे. त्यात मोहिते पाटील नगर, एकता नगर, साठे नगर, ट्रान्झिट कॅम्प या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, दहा वर्षे लोटली, तरी एकही शाळा बांधण्यात आली नसल्याने शेकडो विद्यार्थी मोफत शिक्षणापासून वंचित आहेत. मानखुर्दमध्ये गेल्या काही वर्षांत अनेकांचे पुनर्वसन झाले आहे. तसेच, कामगार वर्गाचीही संख्या वाढली आहे.
मानखुर्दमध्ये सद्यस्थितीत पालिकेची केवळ एकमेव एम.पी.एस महाराष्ट्र नगर इंग्रजी शाळा सुरू आहे. आर्थिक स्थिती बिकट असलेल्या अनेक कुटुंबांतील मुलांना पालिकेच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी धडपडत असतात. मात्र, मानखुर्द भागात पालिकेची अन्य शाळा नसल्याने बहुतांश विद्यार्थी देवनार, शिवाजीनगर, गोवंडी येथील पालिकेच्या शाळेत जातात. अनेक वर्षांपासून मानखुर्दमधील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देणारी मानखुर्द गावातील पालिकेची शाळा सुमारे सहा वर्षांपूर्वी पाडण्यात आली. मात्र अद्याप या शाळेची पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. अनेकांना शाळेच्या पुनर्बांधणीची प्रतीक्षा आहे.
मानखुर्दमध्ये पालिकेची शाळा नसल्यामुळे मुलांना देवनार येथील शाळेत जावे लागते. मात्र, वेळेवर बस किंवा रिक्षा मिळत नसल्याने त्यांचा प्रवास अत्यंत त्रासदायक होतो, अशी खंत राधा वर्मा यांनी व्यक्त केली.
मानखुर्द गावात काही वर्षांपूर्वी तोडकाम झालेल्या शाळेचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बांधकामासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच, अन्य ठिकाणी जमीन उपलब्ध झाल्यास तेथेही शाळा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
मुलांना शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे बालहक्क आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच, शाळा नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत. मानखुर्दमध्ये पालिकेची शाळा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनधिकृत शाळेत जातात. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. नवीन शाळेसाठी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. – संतोष सुर्वे, सचिव, जनजागृती विद्यार्थी संघ