मुंबई : उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, असे म्हटले असेल तर सरसकट आरक्षण शब्द काढा. ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे. त्यांना तरी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घ्या, अशी मागणी मनोज जरांगे – पाटील यांनी रविवारी केली. तसेच आंदोलकांना एक काठी जरी मारली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद पाडू, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठका घेऊन फक्त वेळकाढूपणा करीत आहे. राज्य सरकार असेच वागत राहिले आणि आंदोलकांना फक्त काठी जरी मारली तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडू. रेल्वेसह सर्व वाहतूक बंद पाडू. मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये.
आम्ही आजवर शांततेत आंदोलन करीत आलो आहे. आजवर आम्ही सरकार, न्यायालय आणि समितीला आम्ही सर्वकाही समजावून सांगत आलो आहे. आमच्या सयमाला सीमा आहे. आमची मनःस्थिती ढळण्याची वाट पाहू नका. आम्हाला घाणेरडी वागणूक देऊ नका. आम्ही मार खायला जन्माला आलो नाही. आमची आस्मिता जागी झाल्यानंतर आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे राज्याची शांतता धोक्यात येईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
मंत्रालय, मंत्र्यांच्या बंगल्यांना कडेकोट सुरक्षा
मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री मंत्रालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौकात जोरदार आंदोलन करून वाहतूक रोखून धरली होती. आंदोलकांची वाढती आक्रमकता आणि संख्या पाहून पोलिसांनी मंत्रालय आणि मंत्रालयाच्या परिसर बॅरिकेड लावून बंद केला आहे. वाहतुकीसह पायी चालत जाण्यालाही अटकाव केला जात आहे. रविवार सकाळपासून मंत्रालय आणि परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.