मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारी आझाद मैदानावर दाखल झाले आणि मराठा आंदोलकांची मुंबईत रिघ लागली. आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. तर काही आंदोलनकर्ते भगव्या टोप्या, भगवे उपरणे खांद्यावर मिरवत दक्षिण मुंबई पर्यटन करीत फिरत होते. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्ह, चर्चगेट आणि आसपासच्या पर्यटनस्थळांना भेटी देत मंत्रालय, विधि मंडळ, आयुर्विमा महामंडळसहा अन्य कार्यालयांच्या पुरातन वारसा वास्तू, अथांग सागर, मलबार हिल परिसराचे दर्शन घेत आंदोलक फिरत होते. मात्र त्याच वेळी दक्षिण मुंबईमधील फेरीवाल्यांनी आपले ठेले बंद ठेवल्यामुळे आंदोलकांना तृष्णा भागविण्यासाठी वणवण करावी लागत होती.

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर शुक्रवारी आंदोलन करण्यास परवानगी दिली. त्यानुसार मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांच्या लवाजाम्यासह शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर डेरेदाखल झाले. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही’ , ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल होत होते. कुणी रेल्वेने सीएसएमटी स्थानकात उतरून आझाद मैदानात येत होते, तर कुणी आपले वाहन दूरवर उभे करून चालत आझाद मैदान गाठत होते. घोषणाबाजी, ढोल-ताशाच्या गजराने आझाद मैदान आणि आसपासचा परिसर दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे आझाद मैदानावर धडकतच होते. आझाद मैदान आणि परिसरात उभे राहण्यासही जागा मिळत नव्हती. अखेर काही कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला आणि त्यांच्या मुंबई दर्शनाला सुरुवात झाली.

सीएसएमटी परिसरातील आंदोलनाला हजेरी लावल्यानंतर काही कार्यकर्त्यांचे जत्थे गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्हचा समुद्रकिनाऱ्यापासून थेट मलबार हिलपर्यंतच्या परिसरता फेरफटका मारताना दिसत होते. दक्षिण मुंबईमधील पर्यटनस्थळांचे दर्शन घेत असताना काही आंदोलक रस्ता चुकल्यामुळे भांभावले होते. मग मुंबईकरांना हेरून ते आझाद मैदानावर कसे पोहोचायचे याची विचारपूस करीत होते. त्यानंतर ते पुन्हा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत होते.

फेरीवाले बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर दाखल झाले आणि आझाद मैदानासह आसपासचा परिसर आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला. आंदोलकांची गर्दी वाढू लागल्यानंतर आझाद मैदान, सीएसएमटी, चर्चगेट, नरिमन पॉइंटसह आसपासच्या परिसरातील फेरीवाल्यांनी आपापले ठेले बंद केले. तसेच या परिसरातील खाऊ गल्ल्याही सुन्यासुन्या झाल्या. मात्र त्याच वेळी आंदोलक या परिसरात फेरफटका मारताना दिसत होते. परंतु फेरीवाल्यांचे ठेले बंद असल्याने त्याना साधी पाण्याची बाटलीही विकत मिळत नव्हती. काही ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फेरीवाल्यांनी आपापले स्टॉल्स, ठेले बंद ठेवणे पसंत केल्याचे दृष्टीस पडत होते. मात्र त्यामुळे कुठेच खाद्यपदार्थ मिळत नसल्याने आंदोलकांचे हाल झाले.