मुंबई : ज्या मंत्रालयात राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय, बैठका, परिषदा व चर्चा हे महत्त्वपूर्ण कामकाज सुरू असते, अशा मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात गणेशोत्सवापासूनच आणि दसरा-दिवाळीनिमित्ताने मोठा बाजारच भरला आहे. लोणचे, मसाले, तिखट, पापडापासून साड्या, तयार कपडे व पादत्राणेही उपलब्ध आहेत. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचारी आणि मंत्रालयात कामानिमित्त आलेले नागरिक आणि बंदोबस्ताची जबाबदारी असलेले पोलीसही या स्टॉलवर खरेदी करीत आहेत.

मंत्रालयाला कॉर्पोरेट चेहरा देऊन कामकाजात शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार डिजिटल प्रवेश, मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा ओळख (फेस स्कॅनिंग) पद्धती यासह अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात आला असून चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय किंवा डिजिटल ओळखपत्राशिवाय प्रवेशद्वार उघडत नाही. टप्प्याटप्प्याने प्रत्येक मजल्यावरही अशी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येणार असून नागरिकांना ज्या मजल्यावर काम असेल, त्या विभागातच प्रवेश देण्यात येणार आहे. नागरिकांना प्रवेशावर अनेक निर्बंध असून गृह खात्याच्या सूचनेनुसार जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, औषधे आदी पदार्थ आत आणण्यास मनाई आहे.

सर्वसामान्यांसाठी सुरक्षेचे नियम कडक केले असताना मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजार भरविण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादने, बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, या उद्देशाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली जाते. त्या खरेदी करण्यासाठी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच कामासाठी आलेले नागरिक व इतरही गर्दी करीत आहेत.

सोयीचे नियम?

सर्वसामान्यांनी जेवणाचा डबा, पाण्याच्या बाटल्या आणल्यास मंत्रालय सुरक्षेत अडचणी निर्माण होतात, मग एखाद्याने या स्टॉलवर अशा वस्तू खरेदी केल्यास सुरक्षा नियमानुसार कसे चालते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.