मुंबई: आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना दुपारपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कार्यकर्त्यांची पांगापांग झाली असली तरी त्यांचा उत्साह मात्र कायम आहे. अनेक कार्यकर्ते पावसात भिजत आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले.
मुंबईतील आझाद मैदानात शुक्रवार सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. दुपार झाली तरी कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. विविध भागातून कार्यकर्ते आंदोलनस्थळी येत आहेत. दरम्यान, मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. परंतु त्याचा परिणाम आंदोलकांवर झाला नाही. पाऊस कोसळत असला तरी आंदोलकांचा उत्साह मात्र कायम होता. ‘पाऊस आला काय, वादळ आलं काय, आम्ही हटणार नाही’ असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. अनेक कार्यकर्ते महापालिका इमारत, तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या आडोशाला उभे राहिले.
‘आम्ही शेतकरी आणि कष्टकरी आहोत. पावसाची आम्हाला फिकर नाही. आम्ही जमिनीवरची माणसे आहोत, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही लढत राहणार’ असे एका आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आंदोलक आले आहेत. मात्र त्यात महिलांची उपस्थिती नव्हती.
…तरी जागा सोडली नाही
काही आंदोलक मुंबई महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या सेल्फी पॉईंटवर जाऊन बसले होते. पाऊस आला तरी त्यांनी जागा सोडली नाही. पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी डोक्यावर फलक धरले होते.
आकर्षक घोषणाबाजी
या आंदोलनामध्ये एकापेक्षा एक आकर्षक अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. ‘एक मराठा लाख मराठा’ ही जुनी घोषणा दुमदुमत होतीच, त्याबरोबर ‘कुठूनही घुसा मुंबई दिसा’ अशी घोषणा सर्वांचा लक्ष वेधून घेत होते. आंदोलकांनी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावर ‘एक लाख एक मराठा’, ‘आम्ही सगळे जरांगे’ असा मजकूर होता. अनेक ठिकाणी कार्यकर्ते हलगीच्या तालावर बेभान होऊन नृत्य करीत होते.
आंदोलकांची हुल्लडबाजी
आंदोलन शांततेत सुरू असताना काही आंदोलक हुल्लडबाजी करताना दिसत होते. स्थानकातून येताना तरुण आंदोलक अर्वाच्च भाषेत ओरडत होते. सकाळी स्थानकातून कार्यालयात येणाऱ्या महिलांना धक्काबुक्की केल्याचे काही प्रकार घडले.