मुंबई : गेले सलग चार दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मराठा आंदोलकांनी ठाण मांडला आहे. याठिकाणी जेवणे, बसणे, झोपणे, जल्लोष करणे, वेगवेगळे खेळ खेळणे सुरू आहे. परंतु, सोमवारी दुपारी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच, आंदोलक रेल्वे रुळावर उतरले होते. काही आंदोलकांनी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून, ‘एक मराठा, लाख मराठा’चे फलक नाचवले.

सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सीएसएमटीच्या फलाट क्रमांक २ वर लोकल आली असता मराठा आंदोलक रेल्वे रूळावर उतरले. यावेळी काही आंदोलकांनी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये शिरून ‘एक मराठा, लाख मराठा’चे फलक दर्शवले. त्याशिवाय लोकलसमोर उभे राहून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. बफरच्या ठिकाणी आंदोलक बसले होते. काही वेळेनंतर या आंदोलकांना हटवून लोकल पनवेलच्या दिशेने मार्गस्थ झाली.

मराठा आंदोलकांद्वारे रेल्वे रोखण्याचे प्रकार घडले नाहीत. परंतु, मराठा आंदोलक रेल्वे रुळ ओलांडत होते. सीएसएमटी येथे लोकल रोखण्याचा प्रकार घडला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली.

मध्य रेल्वेवरील लोकल सेवा २५ मिनिटे विलंबाने

सोमवारी सकाळपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावली. तर, हार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटे विलंबाने धावली. दुपारनंतर मध्य रेल्वेवरील लोकल सेवा २५ मिनिटे विलंबाने धावू लागली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाशी रेल्वे स्थानकावर आंदोलक रेल्वे रुळावर

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात मराठा आंदोलक रेल्वे रुळावर आले होते. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. शेकडो मराठा आंदोलक रेल्वे रूळ ओलांडून, एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जात होते. त्यामुळे लोकल मार्गस्थ होण्यास अडचणीचे ठरत होते. घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि आरपीएफ पोहचून, त्यांनी मराठा आंदोलकांना येथून येण्यास मज्जाव केला. तसेच भुयारी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले.

सीएसएमटीवर आंदोलकांकडून खेळले गेले विविध खेळ

मराठा आंदोलकांद्वारे कबड्डी, लगोरी, विठी दांडू, फुगडी, खो-खो, कुस्ती, उड्ड्यांचा खेळ खेळण्यात आला. प्रथम श्रेणीच्या आणि वातानुकूलित लोकलमध्ये घुसखोरी करून प्रवास करण्याचे प्रकार घडले. तर, मुंबईतील रस्त्यावर बेस्ट बसगाडी, चारचाकी वाहनांच्या आडवे येणे, बसच्या टपावर चढून नाचणे, विद्युत खांबावर चढणे, अर्धनग्न आंदोलन, वाकडेतिकडे नाचणे असे प्रकार घडले.

जीवनावश्यक वस्तू वाटल्या

मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने, सर्व उपहारगृहे, खाद्यपदार्थांची दुकाने बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यानंतर, राज्यभरातून ट्रकद्वारे पाण्याच्या बाटल्या आणि अन्नधान्यांचा पुरवठा केला. गेल्या दोन दिवसापासून राज्यभरातून मुंबईत शिधा, खाद्यपदार्थ पुरवण्यात आले. सोमवारीही आझाद मैदानात भाकऱ्यांचा ढीग रचला होता. यासह महापालिकेच्या समोरील रस्त्यावर ट्रकमधून जेवणाचे वाटप केले जात होते. मुंबईस्थित मराठा बांधवांनी जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. अंघोळीचे साबण, दात घासण्याचे ब्रश, टूथपेस्ट व इतर अत्यावश्यक वस्तू वाटण्यात आल्या.