मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत असताना छत्रपती संभाजीराजे यांनी मराठी समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण शनिवारपासून सुरू केले. श्रीमंत मराठय़ांसाठी नव्हे तर गरीब मराठय़ांसाठी लढा असल्याची भूमिका संभाजीराजे यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या वर्षी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. विधिमंडळाचे अधिवेशन ३ मार्चला सुरू होत असल्याने राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयांवर या अधिवेशनात काही निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला भाग पाडण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

माझा लढा हा ३० टक्के श्रीमंत मराठय़ांसाठी नाही तर उरलेल्या ७० टक्के गरीब मराठा बांधवांसाठी आहे. तसेच माझे उपोषण केवळ मराठा आरक्षणासाठी नाही तर समाजाच्या इतर मागण्यांसाठीही आहे, अशी भूमिका संभाजीराजे यांनी  मांडली.

भाजपचा पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानात सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे.

केवळ नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालविणार्या महाविकास आघाडी सरकारने विविध मागण्यांबाबत आतातरी गंभीर व्हावे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी पावले न टाकल्याने छत्रपती संभाजीराजे यांना अखेर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये असे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation convention of the legislature chhatrapati sambhaji raje akp
First published on: 27-02-2022 at 00:41 IST