मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेले आंदोलक ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे घर शोधत आहेत. ॲड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांचे घर कुठे आहे अशी ते विचारणा करीत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुरुवारपासूनच ॲड. सदावर्ते यांच्या घराला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करीत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र, दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे. मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ॲड. सदावर्ते यांच्यावर प्रचंड राग आहे.

भाऊ, ॲड. सदावर्तेचे घर कुठे आहे ?

अनेक मराठा आंदोलक पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले आहेत. सदावर्ते यांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांचे घर कुठे आहे अशी विचारणा ते माध्यम प्रतिनिधींकडे करीत होते. ‘भाऊ, सदावर्तेचे घर कुठे आहे’, असा सवाल कार्यकर्ते करीत होते. त्यातच दुपारी ॲड. सदावर्ते यांनी आंदोलक नियमांचे उल्लंघन करीत असल्याची तक्रार केल्याने कार्यकर्ते अधिकच भडकले होते.

ॲड. सदावर्ते यांच्या घरी पोलीस बंदोबस्त

मुंबईत शुक्रवारी मोठ्या संख्येने आंदोलन दाखल होणार असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त ठेवला आहे. मागील वर्षी मराठा आंदोलकांनी ॲड. सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. त्या पार्श्वभूमीवर ॲड. सदावर्ते यांना असलेला विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी गुरुवारपासूनच त्यांना पोलीस संरक्षण दिले. ॲड. सदावर्ते यांच्या परळ येथील क्रिस्टल टॉवर इमारतीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.