मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून मुंबईकडे येणाऱ्या मराठा आंदोलकांनी नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरून येण्यास पसंती दिली. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत ७०० हून अधिक मराठा आंदोलकांच्या वाहनांनी समृद्धी महामार्गावरील जालना – आमणे दरम्यान प्रवास करून मुंबई गाठली.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी मनोज जरांगे यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
मनोज जरांगे जालन्याचे रहिवासी असून त्यांच्या आंदोलनाला जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील मराठा समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळेच मुंबईतील आंदोलनात मराठवाड्यातील आंदोलकांची संख्या मोठी दिसत आहे. तर मराठवाड्यातून, जालना, छत्रपती संभाजी नगर येथून मुंबईत येण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलकांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला पसंती दिली. अतिजलद प्रवासासाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय निवडला. त्यामुळेच शुक्रवारी दुपारी २ पर्यंत समृद्धी महामार्गावरील जालना – आमणे महामार्गादरम्यान मराठा आंदोलकांच्या ७०० हून अधिक वाहनांनी प्रवास केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी चारचाकी आणि इतर वाहनांना पथकर मोजावा लागतो. अशावेळी गुरुवारी रात्रीपासून समृद्धी महामार्गावरुन मराठा आंदोलकांची वाहने येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहनांची संख्या वाढत गेली. यानुसार शुक्रवारी दुपारी २ पर्यंत ७०० हून अधिक वाहने समृद्धी महामार्गावरून मुंबईत दाखल झाली. जालना – आमणे असा प्रवास करत आलेल्या वाहनांवर फास्टॅग स्टिकर असलेल्यांकडून पथकर वसूल करण्यात आला. मात्र ज्या वाहनांना फास्टॅग स्टिकर नव्हते, ती वाहने पथकर न भरता पुढे गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.