निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून आपल्या कामाचा आणि अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे चतुरस्र रंगकर्मी विनय आपटे यांचे दीर्घकालीन आजाराने शनिवारी सायंकाळी अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वैजयंती कुलकर्णी-आपटे व दोन मुले असा परिवार आहे.
विनय आपटे यांचा एक मुलगा अमेरिकेत असतो. तो रविवारी मुंबईत आल्यानंतर आपटे यांच्या पार्थिवरील अंत्यसंस्काराबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कौटुंबिक सूत्रांकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सिमला येथे एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले असताना आपटे यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर मुंबईत सुमारे दीड महिन्याच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. शुक्रवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वसनाच्या त्रासाबरोबरच अन्य आजारही उफाळल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. नाटय़निर्माते सुधीर भट यांच्यापाठोपाठ रंगकर्मी विनय आपटे यांचे निधन झाल्याने मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसल्याची भावना अनेक कलावंतांनी व्यक्त केली.
विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. नाटक, गजरा, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अ‍ॅन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. अलीकडेच ‘झी मराठी’ वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेत त्यांची भूमिका होती. तर सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम करत होते.  
गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.