मुंबई : मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तसेच, अन्य दिवशीही सर्रासपणे हिंदी गाणी वाजवली जातात. मात्र, यंदा गणेशोत्सवात हिंदी भजन, गाणी वाजविण्यास मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात गणेशोत्सवात केवळ मराठी गाणी वाजवण्याबाबत बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीनेही मंडळांना आवाहन केले होते.
गणेशोत्वसाला बुधवारपासून सुरुवात झाली असून सर्व गणेश मंडळे जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित केल्याने गणेश मंडळांचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये उत्साह आहे. त्यानिमित्ताने अनेक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरवर्षी या उत्सवादरम्यान विविध ठिकाणी हिंदी गाणी लावून दिवसभर नाचगाणे सुरू असते. त्यामुळे सण – उत्सवाचा अनादर होत असल्याचे अनेकांचे मत आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने यंदा सर्व मंडळांना केवळ मराठी गाणी वाजविण्याचे आवाहन केले आहे. उत्सव काळात मराठी सुगम संगीत, भावगीत, भक्तीगीत, भजने, गाणी यांना प्राधान्य द्यावे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित करणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. भाषेची आणि उत्सवाची सांगड घालून मराठीचा जागर करू या, असे आवाहन समितीने केले होते. गणेशोत्सव समितीच्या मराठी भाषेबाबतच्या भूमिकेचे मराठी एकीकरण समितीने कौतुक केले होते. त्यांनतर आता मराठी एकीकरण समितीनेही महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना उत्सवादरम्यान हिंदी भजन, हिंदी गाणी वाजवू नका, असे आवाहन केले आहे.
सणाची टिंगल टवाळकी होईल अशा पद्धतीचे कोणतेही कृत्य मिरवणुकीत न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तुमच्यासमोर जर कोणी हिंदी गाणी, भजने किंवा धांगड धिंगाणा वैगेरे करत असल्यास त्याच ठिकाणी ते बंद करायला लावा, असेही समितीमार्फत सांगण्यात आले आहे.
आपणच आपली मराठी भाषा, मराठी परंपरा, मराठी संस्कार, मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू या. गणेशोत्सव मराठमोळा सण असून ती ओळख टिकवू या, असे भावनिक साद समितीने गणेश भक्त व मंडळांना घातली आहे.