मुंबई : मराठी चित्रपट, कला व संस्कृतीचा जगभरात प्रसार होण्याच्या उद्देशाने दरवर्षी मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा कॅलिफोर्नियातील सॅनहोजे येथे आयोजित करण्यात येतो. यंदा हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे २५, २६ आणि २७ जुलै या कालावधीत दुसरा ‘नाफा’ मराठी चित्रपट होणार आहे, अशी माहिती ‘नाफा’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी दिली.

यंदा ‘नाफा’ चित्रपट महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (सिनिअर), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर आदी प्रमुख कलाकार उपस्थित राहणार आहेत. ‘नाफा’ महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे. यंदा या महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची नावे जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच ‘जागतिक चित्रपट’ या विभागात इतर देशातील त्यांच्या भाषेतील चित्रपट दाखवण्यात येतील.

‘देऊळ’ व ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते आणि ‘सुवर्ण कमळ’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ म्हणजेच ‘नाफा’ची गेल्यावर्षी स्थापना करण्यात आली होती. गतवर्षी सर्वात पहिल्यांदा २७ आणि २८ जुलै २०२४ रोजी हा सोहळा कॅलिफोर्निया, अमेरिका, कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या जवळपास साडेपाच लाख मराठी प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचविण्याची धडपड ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दर महिन्याला १ मराठी चित्रपट ‘उत्तर अमेरिका – कॅनडा’मध्ये २०२४ पासून प्रदर्शित होत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करारही केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘देऊळ’ या माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाल्यानंतर नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. माझ्या या विचाराशी सहमत असलेले ५०० हून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. वर्षाअखेरीस दोन लघुपटाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी मराठीतील दिग्गज कलाकार व दिग्दर्शकांच्या कार्यशाळा व विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून अमेरिकेत सातासमुद्रापार मराठी चित्रपटसृष्टी उभारणीचे स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्य सर्व कलावंत आणि तंत्रज्ञाच्या साथीने लवकरच पूर्णत्वास जाईल’, असे ‘नाफा’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी सांगितले.