मंत्रालयाच्या दारात फाटकी वस्त्रे नेसून मराठी भाषा उभी असल्याचे म्हटले जाते. तथापि यापुढे मराठी भाषा वैभवसंपन्न बसून मंत्रालयाच्या दारात पैठणी नेसून उभी असलेली दिसेल असे सांगत लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती तसेच गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस योजना आखण्यात येत असून ज्येष्ठ कलावंतांचे मानधन इसीएसद्वारे थेट बँकेत जमा होईल असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील गडकिल्ले, मराठी भाषा, संस्कृती, बोलीभाषा तसेच क्रीडा यादी विषयांबाबत शासनाची भूमिका काय असावी याबाबत अतुल भातखळखर, राम कदम, सुनील शिंदे, गुलाबराव पाटील, देवयानी फरांदे आदींनी चर्चा उपस्थित केली होती. उत्तरादाखल मराठी भाषा संवर्धन, वाचन संस्कृती, बोलीभाषा, मराठी भाषाविषयक मंडळे, मराठी संस्कृती, गडकि ल्ल्यांची जपणूक तसेच क्रीडा धोरण आदींबाबत कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगत लवकरच ठोस धोरण जाहीर करण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले. मराठी पुस्तके वाचली जावी यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ संकल्पना तयार करण्यात आली आहे. मराठीविषयक वेगवेगळ्या मंडळांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून यापुढे प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची चित्रफित दाखविण्यात येणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. मराठी साहित्याच्या विक्रीसाठी नगरपालिका तसेच महापालिकांमधील गाळे पुस्तक विक्रीसाठी स्वस्तात भाडय़ाने उपलब्ध करून देण्याची योजना, आगामी पंचवीस वर्षांसाठी मराठी भाषा विकासाचे धोरण, मराठीची गोडी शाळेतील मुलांमध्ये निर्माण व्हावी तसेच सीबीएससी व आयसीआयसीमध्येही मराठी भाषेचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तावडे म्हणाले. दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण होत आहेत परंतु त्यांना प्राईम टाईममध्ये शो साठी जागा मिळत नाही. यापुढे प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपटांना वेळ द्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले. सध्या साठ बोलीभाषा असून त्याची जपणूक करण्यासाठी डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. तसेच १९९ कायद्यांमध्ये‘ बॉम्बे’ असा उल्लेख असून त्याऐवजी ‘मुंबई’ असे करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2015 रोजी प्रकाशित
यापुढे मंत्रालयाच्या दारात मराठी पैठणी नेसून असेल – विनोद तावडे
मंत्रालयाच्या दारात फाटकी वस्त्रे नेसून मराठी भाषा उभी असल्याचे म्हटले जाते. तथापि यापुढे मराठी भाषा वैभवसंपन्न बसून मंत्रालयाच्या दारात पैठणी नेसून उभी असलेली दिसेल असे
First published on: 08-04-2015 at 12:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi soon get classical language status says vinod tawde