मुंबई : ऐन पावसाळ्यातही मराठवाडा तहानलेलाच आहे. जालना, छत्रपती संभाजीनगरला आठवड्यातून एकदा पाणी मिळते आहे. यासह संपूर्ण विभागात २१७ गावे आणि ४९ वाड्यांना ३४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ३९२९ योजना पूर्ण होऊन टंचाई स्थितीत फारशी सुधारणा झाली नसल्याची स्थिती आहे.

विधान परिषदेत राजेश राठोड, हेमंत पाटील आदींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मराठवाड्यातील टंचाईच्या स्थितीची कबुलीच दिली. आजही छत्रपती संभाजीनगरला आठवड्यातून एक दिवस पाणी मिळते आहे. विभागात एकूण २१७ गावे आणि ४९ वाड्यांना ३४३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५४ गावांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरला सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते. शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम सुरू आहे, डिसेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. जालना शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नही गंभीर आहे.

सात दिवसांनंतर एक ते दीड तास पाणीपुरवठा केला जात आहे. जालन्यासाठी एका योजनेचे काम सुरू आहे, ते झाल्यानंतर एक दिवसआड पाणी मिळणे शक्य होईल, असेही बोर्डीकर म्हणाल्या. पूर्वीच्या पाणी पुरवठा योजना बंद असणे, त्या तोकड्या पडणे. पाण्याचा उद्भव नसणे आणि लोकसंख्या वाढ आदी कारणांमुळे मराठवाड्यात शहरांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याचेही लेखी उत्तरात नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जल जीवन मिशनच्या योजना फसल्या

जल जीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण ८४७७ योजना मंजूर आहेत. त्यापैकी ३९२९ योजना पूर्ण झाल्या आहेत, तर उर्वरीत ४५५६ योजना रखडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९०, जालन्यात २५९, बीडमध्ये ३७७, परभणीत ३६१, हिंगोलीत २३६, नांदेडमध्ये ११२४, धाराशिवमध्ये ३६७ आणि लातूरमध्ये ५०७ योजना पूर्ण झाल्या आहेत. तरीही पाणी पुरवठ्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. उर्वरीत ४५५६ योजना लवकरच पूर्ण करण्यात येतील, असेही बोर्डीकर म्हणाल्या.