मुंबई : सीएसएमटी येथील फ्लोरा फाऊंटननजीकच्या रुस्तम इमारतीला शनिवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आग इमारतीतील बाटा शोरुममध्ये पसरल्याने मोठी वित्तहानी झाली.दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. त्याचबरोबर संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, पोलीस आणि बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनीही दुर्घटनास्थळी धाव घेतली. आगीचे वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने रात्री १० वाजून २१ मिनिटांनी आग भीषण स्वरूपाची (क्रमांक – १) असल्याचे घोषित केले. आग इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारांमध्ये पसरली होती.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला. इमारतीतील बाटा शोरुम देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शोरुममधील पादत्राणे, कागदी – लाकडी सामान, बॉक्स आगीत जळून खाक झाले. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. विविध अद्ययावत यंत्रांच्या मदतीने मध्यरात्री २ वाजून ३१ मिनिटांनी आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.