मुंबई : गोरेगाव येथील एस. व्ही. मार्गावरील सिद्धी गणेश सोसायटीतील शालिमार या पाच मजली इमारतीला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाचे जवना घटनास्थळी पोहोचले असून जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारीही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीची तीव्रता सातत्याने वाढत असून अग्निशमन दलाने दुपारी १२.२५ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्र. १) असल्याचे घोषित केले.
आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत असून विविध अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.