मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांना अर्जदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खासगी विकासकांची घरे परवडणाऱ्या दरात म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होत असून या घरांना नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. या सोडतीसाठी अनामत रक्कमेस प्राप्त झालेल्या एकूण १ लाख २५ हजार ००६ अर्जांपैकी ९२ टक्के अर्थात तब्बल १ लाख १५ हजार २९३ अर्ज २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे १५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२ घरांसाठी केवळ ४ हजार ४३ आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १६७७ घरांसाठी केवळ ४ हजार १२१ अर्ज दाखल झाले आहेत. यावरून खासगी विकासकांच्या २० टक्के योजनेतील घरांना अर्जदारांकडून पसंती मिळत आहे. तर दुसरीकडे १५ टक्के योजनेसह म्हाडा योजनेतील घरांना अर्जदारांनी नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे.

कोकण मंडळाने ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी १४ जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र ५ हजार २८५ घरांपैकी म्हाडा गृहयोजनेसह १५ टक्के योजनेतील घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला दोन वेळा १५ – १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळेच ३ सप्टेंबरची सोडत १८ सप्टेंबर आणि त्यानंतर थेट ९ ऑक्टोबरवर गेली आहे. आता अर्ज भरण्याची मुदत १२ सप्टेंबरला, तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबरला संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ पर्यंत ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी एकूण १ लाख ५७ हजार ७८९ जणांनी अर्ज भरले आहेत. यापैकी १ लाख २५ हजार ००६ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी एकूण १ लाख २५ हजार ००६ अर्ज दाखल झाले आहेत. हा प्रतिसाद चांगला मानला जात आहे, पण प्राप्त अर्जांपैकी ९२ टक्के अर्ज केवळ २० टक्के योजनेतील खासगी विकासकांच्या ५६५ घरांसाठी आले आहेत. केवळ ५६५ घरांसाठी तब्बल १ लाख १५ हजार २९३ अर्ज सादर झाले आहेत. म्हणजेच एका घरामागे २०४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

सोडतीतील २० टक्के योजनेला प्रचंड प्रतिसाद असताना दुसरीकडे १५ टक्के, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांकडे मात्र अर्जदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सोडतीत सर्वाधिक १५ टक्के योजनेतील ३००२ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ ४ हजार ४३, तर म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १६७७ घरांसाठी केवळ ४ हजार १२१ अर्ज सादर झाले आहेत. इतर योजनेतील ४१ घरांसाठी १ हजार ०७४, तर ७७ भूखंडांसाठी ४७५ अर्ज दाखल झाले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. १५ टक्के आणि इतर योजनेतील घरांना कमी प्रतिासाद असला तरी आता मात्र सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिला जाणार नसल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता १५ सप्टेंबरपर्यंत किती अर्ज दाखल होतात आणि सोडतीत किती अर्जदार सहभागी होतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

योजना – घरांची संख्या – एकूण अर्ज – अनामत रक्कमेसह सादर झालेले अर्ज

२० टक्के योजना – ५६५ – १,४५,१३० – १,१५,२९३

१५ टक्के योजना – ३००२ – ५०३१ – ४०४३

म्हाडा गृहनिर्माण – १६७७ – ५४७३ – ४१२१

भूखंड – ७७ – ७०५ – ४७५

इतर योजना – ४१ – १४५० – १०७४