अभ्यासक्रमांद्वारे प्रमाणपत्रे देणारी यंत्रणा कार्यरत;प्रमाणपत्रांच्या आधारे शेकडो परदेशात नोकरीवर
विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बोगस प्रमाणपत्रांचा मामला आजपर्यंत अनेकदा उघडकीस आला आहे. परंतु नवी मुंबईतील ‘मरिन सेंटर’ नावाची संस्था ‘एके-४७’ आणि ‘एसएलआर’सारख्या घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक दावा प्रमाणपत्राद्वारे करीत आहे. ही शस्त्रास्त्रे केवळ लष्करी आणि पोलिसांमधील उच्चाधिकाऱ्यांना काही अटींवर वापरता येतात. त्या अत्याधुनिक आणि घातक ‘एके-४७’ किंवा ‘एसएलआर’ या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचे ही संस्था नमूद करीत आहे. गेल्या सात वर्षांत या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून परदेशात पाठविण्यात आलेल्या या ३०० ते ४०० व्यक्ती देशी-विदेशी मालकीच्या जहाजांवर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचा अंदाज आहे.
या प्रकाराच्या मुळाशी जायला हवे, अशी प्रतिक्रिया मेरिटाइम सल्लागार दीपक दिवेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान आपली संस्था केवळ ‘शिप सिक्युरिटी ऑफिसर्स’चेच प्रशिक्षण देते, असा दावा ‘मरिन सेंटर’ संस्थेचे पार्थो दास यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
मात्र प्रमाणपत्रांचा उल्लेख केल्यावर त्यांनी आपल्या संस्थेच्या नावे कुणीतरी बोगस प्रमाणपत्रे तयार केली असावी, असे स्पष्ट करत आरोप फेटाळून लावले.
कायदा धाब्यावर..
शिपिंग कंपन्या कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय, फायर फायटिंग असे रिफ्रेशमेंट कोर्सेस पूर्ण करण्याची मागणी करीत असतात. त्याचाच भाग म्हणून ही प्रमाणपत्रे देण्याचे रॅकेट भारतात पसरले असावे. परंतु या कंपन्यांना या शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार का हवे आहेत, असा प्रश्न उद्भवतो. नवी मुंबईतील या संस्थेविषयी आमदार बच्चू कडू यांनी तक्रार केली असून ही प्रमाणपत्रे नेमकी कुणाला दिली गेली आहेत, याचा ठाव काढावा, अशी मागणी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना पत्र लिहून केली आहे.
या संदर्भातील तक्रार अद्याप आपल्यापर्यंत तरी आलेली नाही, परंतु तक्रारदारांनी संपर्क साधल्यास आम्ही याप्रकरणी लक्ष घालू.
प्रभात रंजन, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>