तरुणाईतील व्यसनवाढीची पोलिसांनाही चिंता

कोकेनसारखीच नशा पण कमी दरात या वैशिष्टय़ामुळे ‘एमडी’ हा अमली पदार्थ अल्पावधीतच तरुणाईसाठी प्रखर जहर ठरू लागला आहे. शहराच्या ठरावीक भागात, उच्चभ्रू वर्गातील काही व्यक्तिंकडून सुरू झालेला ‘एमडी’चा प्रसार आता मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांनाही आपल्या जाळय़ात ओढू लागला आहे.

अत्यंत सहजपणे उपलब्ध होत असल्याने तसेच अनेक प्रकारे नशा करणे सुलभ असल्याने दिवसेंदिवस एमडीची लोकप्रियता वाढीला लागली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत एमडीचा प्रादुर्भाव पोहोचला आहे.

एमडीचा वाढता प्रादुर्भाव ओळखून अंमलीपदार्थविरोधी पथकातील तत्कालिन अधिकाऱ्यांनी, दहशतवादविरोधी पथकातील तज्ञ अधिकाऱ्यांनी एमडीचा समावशे एनडीपीएस कायद्यात घातक अंमलीपदार्थ म्हणून करावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. २०१५मध्ये पाठपुराव्याला यश आले आणि एमडी या कायद्यात समाविष्ठ करण्यात आले.

या कायद्यानुसार कारवाया सुरू झाल्या. पण एमडीचा प्रसार रोखण्यात गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थविरोधी पथक(एएनसी), केंद्रीय अंमलीपदार्थविरोधी पथक(एनसीबी), राज्य दहशतवादविरोधी पथक(एटीएस), महसूल गुप्तचर संचालनालय(डीआरआय) या यंत्रणांना तितके यश आलेले नाही. विशेष म्हणजे अगदी सहा महिने सतत एमडी सेवन करणारे तरूण मरणपंथाला लागले. याचे सातत्याने सेवन करणाऱ्या व्यक्तीची प्रकृति एचआयव्ही किंवा टीबीची लागण झालेल्यांपेक्षाही खालावते.

ही उदाहरणे डोळयांसमोर असूनही एमडीची लोकप्रियता घटली नाही, उलट वाढली, ही या यंत्रणांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

तसेच या अंमलीपदार्थाच्या विक्रीतून उत्पन्न होणारा पैसा दहशतवाद रूजवण्यासाठी किंवा गुन्हेगारीसाठी वापरला जाऊ शकतो, ही भीतीही कायम आहेच.

घातक रसायनांचे मिश्रण

ब्रोमिल, फॉर मिथाईल प्रोपो फिनाईल, मोनो मिथेलामाईन, हायड्रोग्रोमिक अ‍ॅसिड अशा विविध ज्वलनशील, स्फोटक आणि पर्यायाने घातक रसायनांच्या मिश्रणातून मेफ्रेडोन तयार केले जाते. पूर्वी या रसायनाचा उपयोग कीटकनाशक वा मृत पशूंचे देह लवकरात लवकर कुजावेत यासाठी केला जात होता; मात्र साधारणपणे तीन वर्षांपासून या रसायनाचा उपयोग नशेसाठी केला जातो ही बाब पुढे आली.याचे परिणाम नियमित सेवन सुरू केल्यापासून महिन्याभरात दिसून येतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मेफ्रेडोन रसायन शास्त्राचे विद्यार्थी वा औषध निर्मिती, औषध विक्री तज्ज्ञ असलेले मेफ्रेडोन सहज तयार करू शकतात. अलीकडेच एएनसीने कर्नाटकातील हंगल भागात साबण निर्मितीच्या नावाखाली उभारलेला मेफ्रेडोनचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारखान्यात तयार होणारे मेफ्रेडोन मुंबईत विकले जात होते. या कारखान्यातून रामदास नायक या अ‍ॅग्रो बायो केमेस्ट्री या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणाला अटक करण्यात आली. एमडी उत्पादनासाठी आवश्यक असलेले रिअ‍ॅक्टर वडाळयातील भंगार दुकानातून विकत घेण्यात आले होते. त्यानंतर डीआरआयने पालघर येथील कारखाना उध्वस्त केला. त्यातील रिअ‍ॅक्टर महापे येथून विकत घेण्यात आले होते.