मुंबईमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांपासून गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून एकूण ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. देवनार, गोवंडीचा भाग असलेल्या एम पूर्व विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>सेंच्युरी मिल संक्रमण शिबीर दुर्घटनेची चौकशी; एमएमआरडीएने सल्लागाराकडून मागविला अहवाल

मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असून गोवर संशयित तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे पालिकेने घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गोवंडी परिसर विभागात एकूण ६९,२१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गोवंडीत घराघरापर्यंत पोहोचून गोवर प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवली जात असून गुरुवारी १३० मुलांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये नऊ महिने आणि १६ महिन्यांची मुले आणि आठ गर्भवती स्त्रियांचाही समावेश आहे.

हेही वाचा >>>मुंबई:व्यावसायिक जितेंद्र नवलानी विरोधातील गुन्ह्याचे प्रकरण;ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात सहभाग नाही

पालिकेने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून या वेळी जे रुग्ण सापडतील त्यांना जीवनसत्त्व ‘अ’च्या गोळय़ा देण्यात येत आहेत. यासह रुग्णांची सर्व माहिती घेऊन जर लसीकरण झाले नसेल तर त्यांचे लसीकरण केले जात आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच नऊ महिने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाची अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे तसेच लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे १० टक्के बालके ही अर्धवट लसीकरण झालेली व २५ टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: नवजात बालकांची विक्री करणाऱ्या दोन महिला अटकेत

अतिरिक्त लसीकरण सत्रे
गोवंडीबरोबरच वडाळा, शीव, वांद्रे पूर्व, कुर्ला, मालाड या विभागांतही ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये गोवर/ रुबेला आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आल्याने या विभागांमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. गोवर या आजारामध्ये बालकास ताप येऊन त्याला सर्दी, खोकला व अंगावर लालसर पुरळ येते. अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरूपाची होऊ शकते. उदा. फुप्फुसदाह, अतिसार, मेंदूचा संसर्ग तसेच गर्भवती स्त्रीला गोवरचा संसर्ग झाल्यास गर्भातील बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते.

हेही वाचा >>>“जे शिंदे-फडणवीसांसमोर झुकले नाहीत ते…”; ‘शिवसेना फोडण्यासाठी ‘ईडी’चा वापर’ झाल्याचा आरोप करत ठाकरेंकडून हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लशींच्या मोफत मात्रा
महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या रुग्णांची संख्या इतरत्र वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गोवर व रुबेला या आजाराच्या लशीची पहिली मात्रा बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर आणि दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. दोन्ही मात्रा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रे, दवाखाने, सर्वसामान्य रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे मोफत उपलब्ध आहेत.