विनायक डिगे, लोकसत्ता

मुंबई : करोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे. साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र जगभरात सलग दोन वर्षे धुमाकूळ घालणाऱ्या करोनाच्या तुलनेत गोवरच्या प्रसाराचा वेग पाच पट अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गोवर लहान मुलांमध्ये अधिक वेगाने पसरण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

साथीच्या आजाराची घातकता ही त्याच्या प्रसाराच्या वेगाने ठरवली जाते. ज्या रोगाचा प्रसाराचा वेग हा अधिक असतो तो रोग अधिक घातक मानला जातो. एका रुग्णाकडून किती रुग्णांना रोगाची लागण होऊ शकते यावरून प्रसाराचा वेग ठरविला जातो. गोवर प्रसाराचा वेग करोनापेक्षा पाच पट अधिक असला तरी, गोवरचा सर्वाधिक धोका महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना आहे. अपवादात्मक परिस्थितीत १८ वर्षांवरील व्यक्तींना याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. शिवाय गोवरची लस ही ९९ टक्के सुरक्षित आहे. त्यामुळे गोवर प्रसाराचा वेग अधिक असला तरी लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादित आहे. याउलट करोना हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. त्याच्यावर सुरुवातीच्या काळात कोणतीही लस नसल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

वेग पाचपट कसा?

रोगाच्या प्रसाराचा वेग हा ‘आर नॉट’ या एककाच्या माध्यमातून मोजला जातो. एका रुग्णाकडून किती व्यक्तीना विषाणूची लागण होते, यावरून प्रसाराचा हा वेग ठरवला जातो. गोवरची लागण ही एका रुग्णाकडून साधारणपणे १२ ते १४ जणांना होत आहे. त्या तुलनेत करोनाची एका रुग्णाकडून तीन ते चार जणांनाच लागण होत होती.

करोनापेक्षा गोवरचा प्रसाराचा वेग अधिक आहे. मात्र त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे प्रभावी लसीकरण आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. ६ महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग