मुंबई : वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी रखडलेली असताना आयुष अभ्यासक्रमाची (बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस) तिसऱ्या फेरीची निवड शनिवारी जाहीर करण्यात आली.

एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीत जागा वाढल्याने आयुषला सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे आयुषच्या अनेक सरकारी महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहूण्याची शक्यता आहे. परिणामी आयुषच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. चांगले पर्सेंटाईल असूनही अनेक विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांपासून वंचित राहावे लागणार आहे.

नीट यूजी परीक्षेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळवलेले विद्यार्थी हे एमबीबीएस, बीडीएस व आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठ पात्र ठरतात. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीतर्फे (एमसीसी) एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची तर केंद्रीय आयुष प्रवेश समुपदेशन समितीमार्फत (एएसीसीसी) आयुष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेचे नियोजन केले जाते. राज्य स्तरावर सीईटी कक्षामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

दरवर्षी एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या फेरीपाठोपाठ आयुष अभ्यासक्रमांच्या फेरीचे नियोजन केले जाते. यामुळे एमबीबीएसला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आयुष अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी मिळत असते. मात्र यंदा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीपूर्वी ६ हजार ८५० जागा तर तिसऱ्या फेरीपूर्वी ४ हजार ९५० जागा अशा ११ हजार ८०० जागा वाढवल्या. तिसऱ्या फेरीपूर्वी दोन टप्प्यात जागा वाढविण्यात आल्याने एमसीसीने तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक लांबणीवर टाकले. मात्र एएसीसीसीने नियोजित वेळापत्रकानुसार आयुषची तिसरी फेरी जाहीर केली. परंतु एएसीसीसीच्या नियमानुसार आयुषच्या तिसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळेल त्यांना ती जागा स्वीकारणे अनिवार्य असेल. त्याने जागा स्वीकारली किंवा नाकारली तरी तिसऱ्या फेरीत जागा मिळालेला उमेदवार हा पुढील फेऱ्यांसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे विद्यार्थी द्विधा मनस्थितीमध्ये सापडले आहेत.

एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीमध्ये ४ हजार ९५० जागा वाढल्या. यामध्ये महाराष्ट्रामध्ये ३०० जागा वाढल्या आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात शासकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या १३८ जागा, खासगी महाविद्यालयांत ४६८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आयुषच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या उच्च गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अखिल भारतीय कोट्यात किंवा राज्य कोट्यामध्ये प्रवेशाची संधी निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यास ते आयुषचे प्रवेश रद्द करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुषच्या अनेक नामांकित किंवा सरकारी महाविद्यालयांमध्ये जागा उपलब्ध होतील.

आयुषची तिसरी फेरी ही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीपूर्वी झाल्याने चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना नामांकित व सरकारी महाविद्यालयातील प्रवेशापासून वंचित राहावे लागणार असून, त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी किंवा नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. यामुळे चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीईट कक्षाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेण्याची अट शिथिल करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.