मुंबई : राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी जाहीर झालेल्या निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी २४ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा होता. मात्र राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही, त्यामुळे याची सर्व विद्याथी व महाविद्यालयांनी दखल घेऊन प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सीईटी कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.