मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी २२ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर दुसरी फेरी कधी जाहीर होणार याकडे राज्यासह देशातील विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत. पहिली फेरी संपून १७ दिवसांहून अधिक दिवस उलटले तरी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकासंदर्भात कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) वैद्यकीय समुपदेशन समितीमार्फत (एमसीसी) वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली फेरी झाल्यानंतर एनएमसीने देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना व जागा वाढीला मान्यता दिली आहे. तसेच अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एमसीसीकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची दुसरी फेरी राबविण्यास विलंब होत आहे.
परिणामी, पहिली फेरी २२ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर १७ दिवस उलटले तरी एमसीसीकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची दुसरी फेरी सुरू करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही. एमसीसीकडून प्रथम अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होईल, ती प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दुसऱ्या फेरीचे राज्य कोट्यांतर्गत प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर होते. त्यामुळे राज्य कोट्याअंतर्गत दुसरी फेरी लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अन्य अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असताना वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळेल याची शाश्वती नसल्याने, त्यांना अन्य पर्यायांची चाचपणीही करणे शक्य होत नसल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, महाविद्यालय सुरू होताच विद्यापीठाकडून लगेचच परीक्षा जाहीर करण्यात येईल, याचा परिणाम शिक्षणावर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पहिल्या फेरीमध्ये झालेले प्रवेश
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिल्या फेरीमध्ये राज्यभरामध्ये १० हजार ८६४ विद्यार्थांना प्रवेशाच संधी मिळाली होती. यापैकी तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे पुढील फेरीसाठी ३ हजार ५५ इतक्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८ हजार १३९ जागा असून, पहिल्या फेरीमध्ये ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर १ हजार २९१ जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे दंत अभ्यासक्रमाच्या राज्यामध्ये २ हजार ७२५ जागा असून, ९६१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर १ हजार ७६४ जागा रिक्त आहेत.