मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतून (नीट) स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही वैद्यकीय महाविद्यालयांमधील ६० ते ७० लाख रुपये आणि अभिमत विद्यापीठातील १ कोटी रुपयांचा खर्च परवडत नसल्याने दरवर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशाची वाट धरत आहेत. देशातून दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, फिलिपाईन्स, चीनला विद्यार्थ्यांची पसंती आहे.
देशात दरवर्षी २५ लाखांच्या आसपास विद्यार्थी यूजी नीट परीक्षा देतात. यातील १० ते १२ लाख विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी १ लाखांच्या क्रमवारीत असतात त्यांना खासगी व अभिमत विद्यापीठामध्ये प्रवेशाची संधी मिळते. अधिक गुण असतात त्यांना खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी असते. मात्र तेथे साडेचार वर्षासाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च येतो.

अखिल भारतीय क्रमवारीमध्ये १ लाखाच्या पुढे असतात त्यांना खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अशक्य असते. त्यांच्यासमोर अभिमत विद्यापीठाचा पर्याय असला तरी तेथील १ ते दीड कोटी रुपयांचा खर्च त्यांना परवडणारा नसतो. याउलट परदेशामध्ये संपूर्ण वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा ३० ते ३५ लाख रुपये असतो. त्यामुळे देशात शिक्षण घेण्याऐवजी हे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची क्रमवारी ९ लाखांच्या घरात असते. त्यांना खासगी व अभिमत विद्यापीठामध्येही प्रवेश मिळू शकत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा परदेशात जाण्याशिवाय पर्याय नसतो, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

देशात १ लाख १८ हजारांच्या आसपास वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागा आहेत. यातील २५ ते ३० हजार जागा या सरकारी महाविद्यालयांमध्ये आहेत. त्यात ५० टक्के जागांवर आरक्षण असते. त्यामुळे मुंबईतील केईएमसारख्या रुग्णालयात प्रवेश मिळविण्यासाठी पहिल्या दोन ते तीन हजारांमध्ये येणे गरजेचे आहे. परदेशी विद्यापीठामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात, असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे पाच देश वगळल्यास बाहेरच्या देशातून आलेल्या मुलांना त्यांच्या देशांमधील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण दिले जात नाही. परदेशामध्ये या विद्यार्थ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी नसल्याने त्यांच्याकडे फक्त पदवी असते. त्यामुळे एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांच्या पदवीला किंमत नसते, असे विद्यार्थी पालक संघटनेच्या प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी नमूद केले.

शुल्कामध्ये तफावत

भारतातील दोन वर्षांच्या शुल्कामध्ये परदेशातील संपूर्ण शिक्षण होते.

परदेशामध्ये ४० लाखांमध्ये संपूर्ण शिक्षण होते.

जॉर्जिया, रशिया, फिलीपिन्समध्ये ३० ते ४० लाख

कझाकिस्तानमध्ये २० लाख, चीनमध्ये ३० लाखांमध्ये शिक्षण होते.

हे शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची संधी

भारतात दीड कोटीपर्यंत खर्च

देशात खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी साधारणपणे ६० लाख खर्च

अभिमत विद्यापीठामध्ये हेच प्रमाण एक ते दीड कोटी रुपये

जॉर्जिया, रशिया, फिलिपाईन्स या देशांमध्ये २५ लाखांमध्ये शिक्षण होते.

या देशांमधील महाविद्यालयांचे शुल्क हे साधारणपणे १५ लाखांपर्यंत असते.