Meenatai Thackeray Statue in Shivaji Park Dadar : मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा दावा शिवसेनेने (ठाकरे) केला आहे. या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई घटनास्थळी दाखल झाले. यावेळी देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, “काही समाजकंटकांनी पुतळ्यावर रंग फेकला आहे. कदाचित या भेकडाच्या अवलादींवर संस्कार झालेले नसतील. पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. अशा घटना पाहून पोलीस यंत्रणा काय करतेय? सरकार काय करतंय? असे प्रश्न पडतात. या घटना निषेध करण्यापलीकडच्या आहेत. सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे.

त्या भेकडांना योग्य प्रत्युत्तर देऊ : अनिल देसाई

खासदार अनिल देसाई म्हणाले, “आम्ही शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या घटनेची माहिती दिली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने ही घटना हाताळत आहोत. अशा समाजकंटकांना, भेकडांना योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुतळ्याच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासत आहेत. आम्ही परिसराची स्वच्छता केली आहे. अशा घटना पाहिल्या की मुंबई सुरक्षित नाही याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. या घटना घडत असताना पोलीस काय करतायत? सरकार तर त्यांच्याच भलत्यासलत्या गोष्टीत मशगुल आहे.”

शिवसेना (उबाठा) नेत्या विशाखा राऊत म्हणाल्या, “सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. त्यानंतर कोणीतरी पुतळ्यावर रंग टाकला. आमच्या कार्यकर्त्यांनी रंग पुसून टाकला आहे. परंतु, पोलीस काय करत आहेत असा प्रश्न पडला आहे.”

सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे (उबाठा) स्थानिक शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितलं की पुतळ्यावर आणि चौथऱ्यावर लाल रंग दिसत होता. आमच्या कार्यकर्त्यांनी तो रंग पुसून टाकला. दरम्यान, पोलिसांनी आता शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.