मुंबई : तब्बल दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत अद्याप संदिग्धता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे व गणेशोत्सव समिती यांची बैठक होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्गामुळे मुंबईत टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. करोनाची चौथी लाट संसर्ग ओसरत असून त्यापार्श्वभूमीवर हा पहिलाच गणेशोत्सव होत आहे. मात्र यावेळीही करोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे मॉल, हॉटेल्स, पब आदी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत घालण्यात आलेली बंधने उठविण्यात यावीत. यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे नुकतीच केली होती.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) घडविलेल्या गणेशमूर्तीची विक्री अथवा वापरावर बंदी आहे. तसेच पीओपीची मूर्ती विसर्जनामुळे जल प्रदुषण होत असून ते पाण्‍यात विरघळत नाही. त्‍यामुळे अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच पीओपीच्या मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदुषण होऊन जलचरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात पीओपीपासून घडवलेल्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करू नये, त्याऐवजी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

तसेच कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा अधिक नसावी, अशी विनंतीही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मात्र गणेशोत्सव मंडळांनी पीओपीच्या मूर्तींसाठी आग्रह धरला आहे. शाडू मातीच्या उंच मूर्ती बनविणे कठीण असल्याचे गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाही पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्यास परवानगी मिळावी असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच करोनाविषयक नियम काय असतील तेही या बैठकीत निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे.