Mega Block on Western Railway in Mumbai : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी शनिवारी दुपारी १ ते रविवारी मध्यरात्री १ दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर ३६ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील सुमारे १६२ अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत लोकल सेवा आणि मेल, एक्स्प्रेस जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे.
या ब्लॉकमुळे लोकल सेवेवर परिणाम होणार असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या काळात सुमारे १६२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्थानक व्यवस्थापकाकडे उपलब्ध आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
३० मे आणि ३१ मे २०२५ रोजी सुटणारी गाडी क्रमांक १९४१८ अहमदाबाद – बोरिवली एक्स्प्रेस वसई रोड येथे रद्द करण्यात येईल. त्यामुळे ही रेल्वेगाडी वसई रोड आणि बोरिवलीदरम्यान धावणार नाही.
३१ मे आणि १ जून २०२५ रोजी सुटणारी गाडी क्रमांक १९४२५ बोरिवली-नंदुरबार एक्स्प्रेस भाईंदर येथे रद्द करण्यात येईल. त्यामुळे ही रेल्वेगाडी बोरिवली आणि भाईंदरदरम्यान धावणार नाही.
३१ मे २०२५ रोजी सुटणारी गाडी क्रमांक १९४२६ नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोड येथे रद्द करण्यात येईल. त्यामुळे, ही रेल्वेगाडी वसई रोड आणि बोरिवलीदरम्यान धावणार नाही.
१ जून २०२५ रोजी सुटणारी गाडी क्रमांक १९४१७ बोरिवली – अहमदाबाद एक्स्प्रेस बोरिवलीऐवजी वसई रोडवरून सुटेल.